Maamla Legal Hai Actress Nidhi Bisht Pudhari
मनोरंजन

Maamla Legal Hai Actress: वकिली सोडून मुंबईत आली! 'तू अभिनेत्री दिसत नाहीस...; म्हणत मिळाला नकार; पण हार न मानता गाठलं यश

Maamla Legal Hai Actress: निधी बिष्टला ऑडिशनमध्ये “तू अभिनेत्री दिसत नाहीस” असे ऐकावे लागले होते. वकिलीची नोकरी सोडून ती मुंबईत अभिनयासाठी आली होती.

पुढारी वृत्तसेवा

Maamla Legal Hai Actress Nidhi Bisht: अभिनय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी केवळ टॅलेंट पुरेसं नसतं, तर स्वतःवर विश्वास ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. निधी बिष्ट या अभिनेत्रीने तिच्या संघर्षाची कहाणी सांगताना अनेक भावनिक आठवणी शेअर केल्या आहेत. “तू अभिनेत्री दिसत नाहीस,” असं एका कास्टिंग डायरेक्टरने तिला थेट सांगितलं होतं. मात्र ती खचली नाही.

लहानपणी ती घरातील सर्वात लाडकी आणि खोडकर मुलगी होती. तिच्या वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं. पण तिला विज्ञान शाखेत अजिबात रस नव्हता. तिला दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी विषयात शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासोबत थिएटरमध्ये काम करायचं होतं.

मात्र बारावीनंतर वडिलांनी तिला “एखादा प्रोफेशनल कोर्स कर,” असा सल्ला दिला. त्यामुळे तिने जामिया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि पाच वर्षे कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे तिला वकिलीची नोकरीही मिळाली. पण त्या कामात तिचं मन रमलं नाही.

अखेरीस तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबई गाठली. स्वतःची बचत घेऊन ती मुंबईत आली होती. सहा महिने सहज निभावून नेऊ, असा तिचा विश्वास होता. पण केवळ दोन महिन्यांतच तिचे सर्व पैसे संपले.

त्या काळात स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी आणि अभिनय करण्यासाठी तिने शाळांमध्ये ड्रामा शिकवण्याचं कामही केलं. पण त्यातून तिला जाणवलं की, “माझ्यासारखे हजारो लोक आहेत. वेगळं काहीतरी करावं लागेल.”

याच काळात तिला शाहरुख खानचं एक वाक्य आठवलं. “संधी मिळत नसेल तर स्वतः संधी निर्माण करा,” असा त्याचा मेसेज होता. त्यानंतर तिने काही संघर्ष करणाऱ्या कलाकारांना एकत्र करुन स्वतःचं नाटक तयार केलं.

चित्रपटांच्या ऑडिशनदरम्यान अनेकदा तिला “तू अभिनेत्री वाटत नाहीस,” असं ऐकावं लागलं. पण नंतर त्याच लोकांनी तिचं कौतुक करत “तू खूप क्यूट दिसतेस,” असं म्हटलं. यावर ती हसत म्हणाली, “मी आधीही तशीच होते.”

आज ती 'मामला लीगल है' या मालिकेत अॅडव्होकेट सुजाता नेगीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे तिला खऱ्या आयुष्यातील अनेक आत्मविश्वासू महिलांची आठवण येते, असंही तिने सांगितलं.

तिच्या संघर्षातून तिने एक महत्त्वाचा धडा शिकला आहे. ती म्हणते, “सतत इतरांना इम्प्रेस करण्याची गरज नसते. स्वतःला स्वतःचं काम चांगलं केल्याचं समाधान मिळणं अधिक महत्त्वाचं असतं.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT