पुढारी ऑनलाईन डेस्क: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. भारतीय चित्रपटांत एक काळ गाजवलेल्या मनोजकुमार यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांनी केलेल्या विविध देशभक्तीपर चित्रपटांमुळे 'भारत' हे नाव त्यांना मिळाले होते. आत्ताच्या पाकिस्तानात जन्म, लहानपणीचे संघर्षमय दिवस ते हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाचा नायक असा त्यांचा प्रवास झाला आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी ब्रिटिश इंडियातील अॅबोटाबाद (आता खैबर पख्तुनख्वा प्रांत, पाकिस्तान) येथे एक पंजाबी हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याचं मूळ नाव हरिकृष्णन गिरी गोस्वामी असे आहे.
ते दहा वर्षांचे असताना त्यांचा दोन महिन्यांचा भाऊ आणि आई रूग्णालयात होते. तेव्हा उपचार न केल्याने त्यांनी डॉक्टर आणि नर्सला मारहाणही केली होती. अबोटाबाद येथील संघर्ष, अस्थैर्य, दंगलींमुळे त्यांचे वडिल कुटुंबासह दिल्लीत आले. दिल्लीत काही काळ त्यांनी निर्वासितांच्या छावणीतही काढला.
मनोज कुमार यांनी त्यांनी हिंदू कॉलेजमधून बी.ए.ची डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात नशीब आजमावले. 1957 मध्ये फॅशन चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात झाली होती. पण 60 आणि 70 च्या दशकात त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले. चित्रपटात येण्यापुर्वी त्यांनी व्यावासायिक कारणांसाठी दिलीप कुमार यांच्यावरून प्रेरित होऊन मनोजकुमार असे नाव घेतले.
मनोज कुमार यांनी त्यांनी हिंदू कॉलेजमधून बी.ए.ची डिग्री मिळवली. त्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात नशीब आजमावले. 1957 मध्ये फॅशन चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरवात झाली होती.
पण 60 आणि 70 च्या दशकात त्यांचे चित्रपट लोकप्रिय ठरले. चित्रपटात येण्यापुर्वी त्यांनी व्यावासायिक कारणांसाठी दिलीप कुमार यांच्यावरून प्रेरित होऊन मनोजकुमार असे नाव घेतले.
लालबहादूर शास्त्री यांच्या आवाहनानंतर मनोजकुमार यांनी उपकार चित्रपट बनवला. लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान जय किसान' अशी घोषणा दिली होती. तथापि, हा चित्रपट लालबहादूर शास्त्री पाहू शकले नाहीत. त्यापुर्वीच त्यांचे निधन झाले.
दरम्यान, या चित्रपटात मनोजकुमार यांचे नाव भारत असे होते. चित्रपटानंतर मीडियाने त्याने भारतकुमार संबोधण्यास सुरवात केली. त्यामुळे पुढे देशभक्तीपर चित्रपटांमुळे भारत आणि भारतकुमार अशीच त्यांची ओळख बनली. या चित्रपटापूर्वी अभिनेता प्राण हे केवळ खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. पण या चित्रपटाने त्यांची इमेज बदलली.
भारतीय सिनेमाचा देशभक्त नायक
दरम्यान, त्या-त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रपटातून उमटले. त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच राष्ट्राभिमान, प्रतिकार आणि कष्ट करणाऱ्या लोकांची भूमिका असायची. मनोज कुमार यांनी नायकाच्या भूमिकेतून देशभक्ती, कर्तव्य आणि नैतिकतेच्या मूल्यांना सर्वोच्च स्थान दिले. शहीद, पूरब और पश्चिम, क्रांती, रखवाला, आज़ादी की राह पे आदी देशभक्ती चित्रपट त्यांनी केले.
हरियाली और रास्ता (1962), वो कौन थी? (1964), शहीद (1965), गुमनाम (1965), हिमालय की गोद में (1965), उपकार (1967), पत्थर के सनम (1967), नीलकमल (1968), पूरब और पश्चिम (1970), शोर (1972), रोटी कपडा और मकान (1974), दस नंबरी (1976), क्रांती (1981) इत्यादी चित्रपट लोकप्रिय ठऱले.
मनोजकुमार-मुकेश जोडीची गाणी लोकप्रिय
या चित्रपटांसह इतरही चित्रपटातील त्यांची गाणी प्रचंड गाजली. विशेषतः गायक मुकेश यांनी गायलेली मनोजकुमार यांची गाणी अधिक लोकप्रिय ठऱली. ही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात.
संवादाबाबत बोलायचे तर उपकार चित्रपटातील “मेरा देश महान” हा संवाद त्याच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे. क्रांती चित्रपटातील “जब तक है जान, तब तक है मान” हा संवाद तसेच त्यांच्या देशभक्तीवर इतर चित्रपटातले संवाही त्याकाळात लोकप्रिय ठरले होते.
दादासाहेब फाळके पुरस्कार (2016) - तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
पद्मश्री (2002) - भारत सरकारने भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना पद्मश्री सन्मानाने गौरवले.
1968 मध्ये उपकार चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
स्वर्ण कमल अवॉर्ड (1970)- पूरब और पश्चिम या चित्रपटासाठी त्यांना स्वर्ण कमल अवॉर्ड मिळाले.
फिल्मफेअर - मनोज कुमार यांना 7 फिल्मफेयर पुरस्कार मिळाले आहेत. त्यापैकी उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट कथा आणि उत्कृष्ट संवाद असे 4 पुरस्कार उपकार चित्रपटासाठी मिळाले. बेईमान (1969) या चित्रपटासाठी 1, शोर (1972) चित्रपटासाठी 1 आणि रोटी कपडा और मकान (1976) या चित्रपटासाठी 1 फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.
आयफा कडून जीवनगौरव- आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमीने (IIFA) मनोज कुमार यांना लायफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला.