Fish Venkat
हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता फिश वेंकट (मूळ नाव वेंकट राज) यांचे शुक्रवारी ( दि. १८) निधन झाले. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. किडनी आणि लिव्हर फेल्युअरमुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्यांचे निधन झाले.
वेंकट यांना "फिश वेंकट" हे टोपणनाव एका गाजलेल्या विनोदी भूमिकेमुळे मिळाले होते, ज्यामध्ये त्यांनी मासळी बाजाराचा उल्लेख केला होता. त्यांच्या तेलंगणाच्या खास बोलीतील संवादफेक आणि विनोदी अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले होते.
वेंकट यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज होती. त्यांची मुलगी श्रावंतीने सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आवाहन करत ट्रान्सप्लांटसाठी सुमारे ५० लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले होते. अभिनेता पवन कल्याण, विष्वक सेन आणि तेलंगणा सरकारमधील एका मंत्र्याने त्यांना आर्थिक मदत केली होती. मात्र, योग्य किडनी डोनर वेळेवर मिळाला नाही. दरम्यान, अभिनेता प्रभासकडून मदत मिळाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र वेंकट यांच्या कुटुंबीयांनी त्या बातम्या फेटाळून लावत, त्या अफवा असल्याचे स्पष्ट केले.
फिश वेंकट यांनी ‘गब्बर सिंग’, ‘अधुर्स’, ‘डीजे टिल्लू’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. मुख्यतः विनोदी आणि सहाय्यक भूमिका करत त्यांनी आपल्या खास शैलीतून प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांच्या निधनामुळे तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.