पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाचे अध्यक्ष थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या विरोधात फतवा जारी केला आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातने बुधवारी विजय यांच्याविरुद्ध फतवा जारी करत मुस्लिमांनी त्यांच्यासोबत उभे राहू नये, असे म्हटले आहे.
एआयएमजेचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी म्हटले आहे की, विजय यांनी मुस्लिमांबद्दल नकारात्मक चित्र निर्माण केल्यामुळे तसेच जुगारी आणि मद्यपींना त्यांच्या इफ्तार पार्टीत आमंत्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर हा फतवा जारी केला आहे.
"त्यांनी एक राजकीय पक्षाची स्थापन केली आहे आणि मुस्लिमांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले आहेत. पण, त्यांनी त्यांच्या चित्रपटांत मुस्लिमांबद्दल दहशतवाद पसरवणारे म्हणून नकारात्मक चित्र निर्माण केले," असे रिजवी यांनी नमूद केले.
"त्यांनी त्यांच्या इफ्तार पार्टीत जुगारी आणि मद्यप्राशन करणाऱ्यांना आमंत्रित केले होते. या त्यांच्या कृतीमुळे तामिळनाडूतील सुन्नी मुस्लिम त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी याबद्दल फतव्याची विचारणा केली म्हणून, आम्ही एक फतवा जारी केला. त्यात मुस्लिमांनी विजय यांच्या बाजूने उभे राहू नये असा उल्लेख केला आहे," असेही ते पुढे म्हणाले.
"विजय यांनी त्याच्या 'काठी' आणि 'बीस्ट' चित्रपटांत मुस्लिमांचे चुकीच्या पद्धतीने चित्र दाखवले आहे. यामुळे तमिलगा वेत्री कझगम पक्षाला भीती वाटते की विजय यांना मुस्लिमांकडून धमक्या येऊ शकतात आणि त्यांनी यासाठी गृह मंत्रालयाकडे वाय दर्जाची सुरक्षा मागितली आहे," असा दावा व्हीसीकेचे पक्षाचे प्रवक्ते वनियारासू यांनी केला आहे.
दरम्यान, टीव्हीके आणि त्यांचा मित्रपक्ष तामिळनाडू मुस्लिम लीगने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, डीएमके आणि त्यांच्या मित्रपक्षांचा मुस्लिमांना टीव्हीकेपासून दूर करण्याचा हा डाव आहे.