बॉलीवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी पूर्णपणे वेगळं स्वप्न पाहिलं होतं. काहींनी करिअर स्थिरावल्यानंतर ते स्वप्न पूर्ण केलं, तर काहींनी अभिनयात करिअर करताना जुनं स्वप्न मागे सोडलं. अशाच सेलिब्रिटींत बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता हिचं नाव घेतलं जातं. ईशा शुक्रवारी 40 वर्षांची झाली. ‘जन्नत 2’ मधून इम्रान हाशमीसोबत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी ईशा गुप्ता लहानपणापासूनच अभिनयात येईल असं अजिबात अपेक्षित नव्हतं.
एका जुन्या मुलाखतीत ईशाने सांगितलं होतं की, सुरुवातीला ती प्रोफेशनल शेफ बनण्याचं स्वप्न पाहात होती. फक्त 12 वर्षांची असल्यापासून ती स्वयंपाक शिकू लागली होती. तिच्या वडिलांचे एक मित्र दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये टॉप शेफ होते. ईशाला जेव्हा तिने शेफ बनण्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी एक सल्ला दिला, तू व्हेजिटेरियन आहेस. त्यामुळे तू जास्तीत जास्त एक छोटंसं व्हेजिटेरियन रेस्टॉरंटच चालवू शकशील.
हा विचार ईशाला अजिबात भावला नाही. कारण तिच्या मते ‘काहीतरी छोटं करणं हा माझ्या प्लॅनचा भागच नव्हता.’ आणि इथेच तिने शेफ बनण्याचं स्वप्न सोडून पुढे दुसरी दिशा पकडली. ईशाने अनुपम खेर यांच्या अॅक्टर प्रिपेअर्स या ड्रामा स्कूलमध्ये कोर्सनंतर ऑडिशन्स दिल्या. त्यातूनच ‘जन्नत 2’ मध्ये तिने भूमिका साकारली. या चित्रपटाने जवळपास 42 कोटी रुपयांची कमाई केली होती.