पुढारी ऑनलाइन डेस्क : सस्पेन्स थ्रिलर प्रकारातील एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंनासाठी आज सिनेमाघरात दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसातील बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड पाहता बॉलिवूडला सध्या सूर गवसेना अशी अवस्था दिसत आहे. रॉकेट्री सोडून अन्य कोणत्याही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. गेल्या काही दिवसात शाब्बाश मिथ्थू, रणवीर कपूरचा बिग बजेट समशेरा आदि चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. समशेरा चित्रपटाचे तर अनेक ठिकाणी प्रेक्षकांअभावी शो कँसल करावे लागले. त्यामुळे आता एक व्हिलन रिटर्न्स कडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या एक विलन या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. मात्र, असे असले तरी एक व्हिलनचे कथानक आणि आताचा एक व्हिलन रिटर्न्स यांच्यामध्ये मोठा फरक आहे. एक विलनच्या कथानकात असलेल्या सस्पेन्स पेक्षा आणखी जास्त सस्पेन्स या नव्या सिक्वेलमध्ये आहे. तसेच कलाकारही वेगळे आहेत.
स्टारकास्ट : जॉन अब्राहम, तारा सुतारिया, दिसा पटानी, अर्जुन कपूर आणि रितेश देशमुख
कथा : मोहित सूरी और असीम अरोडा
निर्देशक : मोहित सूरी
निर्माता : बालाजी मोशन पिक्चर्स आणि टी सीरीज
रेटिंग्ज : 3/5
एक व्हिलन रिटर्न्स हा एक व्हिलनचा सिक्वेन्स तब्बल 8 वर्षानंतर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता या चित्रपटात पुन्हा प्रेक्षकांना रस असेल का हे पाहावे लागेल. चित्रपटाची सुरुवात अॅक्शन दृश्याने होते. एक पार्टी सुरू असते या पार्टीत अचानक एक जण येतो आणि सर्वांना मारायला लागतो. त्यानंतर अर्जुन कपूरची एंट्री दाखवली आहे. जो रईस बाप की बिगडी हुई औलाद असे चित्रण दाखवण्यात आले आहे. तर आर्वी खन्ना म्हणजेच तारा सुतारिया ही फेमस होण्यासाठी काहीही करू शकते. नंतर अर्जुन ताराची ओळख होते त्यांच्यात रोमॅन्स दाखवला जातो.
जॉन अब्राहमची ओळख दिशा पटानी सोबत होते. त्यानंतर चित्रपटात मर्डरचा सिलसिला सुरू होतो. मात्र हे खून नेमके कोण करत आहे हे कळत नाही. शंकेची सुई या चौंघांकडे फिरत असते. दरम्यान, हा व्हिलन एकतर्फी प्रेमात विश्वासघात झालेल्या लोकांचा मात्र नायक बनलेला असतो. तर दुसरीकडे पोलीस या व्हिलनचा शोध घेत असते. तसेच एक व्हिलनमधील व्हिलन रितेश देशमुखची देखील नंतर एन्ट्री होते. त्यामुळे कथानकात उत्सुकता निर्माण होते.
दरम्यान चित्रपटात अॅक्शन आणि रोमॅन्सचे दृश्य मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले आहे. अभिनयाच्या बाबतीत विचार केला असता तर जॉन अब्राहमने झोकून देऊन आपली भूमिका साकारली आहे. तर दिशा पटानी ने थोडा-फार बरा अभिनय केला आहे. संगीताच्या बाबतीत अद्याप तरी प्रेक्षकांना भूरळ पाडता आली नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट कमाल करतो का नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.