‘एक राधा एक मीरा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला  Instagram
मनोरंजन

Ek Radha Ek Meera Trailer |महेश मांजरेकर यांच्या ‘एक राधा एक मीरा’चा ट्रेलर

Ek Radha Ek Meera | महेश मांजरेकर यांच्या ‘एक राधा एक मीरा’चा ट्रेलर प्रदर्शित

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - महेश मांजरेकर दिग्दर्शित स्लॉव्हेनियामध्ये चित्रित झालेला पहिला मराठी चित्रपट ‘एक राधा एक मीरा’चा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. मराठीतील एक बऱ्याच दिवसांनी आलेली म्युझिकल लव्हस्टोरी म्हणूनही चित्रपटाची उत्कंठा लागून राहिली असून तो ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे.

मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे झालेल्या अत्यंत दिमाखदार अशा सोहळ्यात ट्रेलरचे प्रकाशन आज करण्यात आले. यावेळी महेश मांजरेकर, निर्माते अविनाशकुमार प्रभाकर आहाले कलाकार गश्मीर महाजनी, मृण्मयी देशपांडे, सुरभी भोसले, संदीप पाठक, आरोह वेलणकर, मेधा मांजरेकर तसेच तंत्रज्ञ उपस्थित होते.

अडीच मिनटांच्या या ट्रेलरमधून चित्रपटाचा पोत समोर येतो. ही एक म्युझिकल लव्ह स्टोरी असली तर तिला अनेक पदर आहेत. ते प्रेम, दुःख, विनोद, भावना यांनी बहरलेले आहेत, हे ध्यानात येते. त्यातील संवाद आणि गाणी चित्रपटाबद्दल उत्कंठा वाढवतात. “मी प्रेमात पडलीय, तो समोर दिसला, त्याचा आवाज ऐकू आला, कोणी त्याचे नाव घेतले तरी त्रास होतो..” “तुला वाटते तसे काहीच नाही...” “मग कसे आहे...?” “काही गोष्टी समोरासमोर बोलाव्या लागतात...”

“तू सतत आसपास हवीशी वाटतेस मला. यालाच प्रेम म्हणत असतील तर मेबी आय एम इन लव्ह विथ यु...” “आतून बुडबुडे आल्यासारखे होते...” अशा खिळवून ठेवणाऱ्या संवादांनी ट्रेलर पुढे सरकार जातो. पार्श्वभूमीवर “ओढ तुझी लागे अनिवार, जरा जरा मी झुरते....” अशी सुमधुर गाणी ऐकू येतात आणि चित्रपटाचा बाज उलगडत जातो. प्रेमभरे संवाद ट्रेलरमधून येत असतानाच आणि ही लव्ह स्टोरी आकाराला येत असतानाच काहीतरी दुःखद घडल्याची चाहूल लागते. “ट्रॅजेडीवाली लव्ह स्टोरी आहे तुझी...” असे संवाद समोर येतात.

अत्यंत ग्लॅमरस आणि हटके अशा या चित्रपटात सोनू निगम, शाल्मली खोलगाडे, सुखविंदर सिंग यांसारख्या दिग्गज गायकांच्या फौजेने चित्रपटाचे पार्श्वगायन केले आहे. सध्याचा आघाडीचा गायक विशाल मिश्रा यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे.

“मराठीत एक वेगळा प्रयोग या माध्यमातून आम्ही केला आहे. ही एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे. आजचे ग्लॅमरस चेहरे यात आहेत. उत्तम गीते आणि उत्तम संगीत चित्रपटाला आहे. चित्रपट दोन आठवड्यांनी प्रदर्शित होत आहे. आज प्रदर्शित झालेला ट्रेलर रसिकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवेल,” असे उद्गार महेश मांजरेकर यांनी काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT