मुंबई: ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि १९७८ साली प्रदर्शित झालेल्या 'डॉन' या कल्ट क्लासिक चित्रपटाचे निर्माते चंद्रा बारोट यांचे रविवारी (दि.२०) सकाळी मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी दीपा बारोट यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. "ते गेल्या सात वर्षांपासून पल्मोनरी फायब्रोसिस (फुफ्फुसांचा गंभीर आजार) या आजाराशी झुंज देत होते," अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्यावर वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात डॉ. मनीष शेट्टी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. यापूर्वी त्यांना जसलोक रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
चंद्रा बारोट यांचे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो म्हणजे १९७८ सालचा 'डॉन'. अमिताभ बच्चन, झीनत अमान आणि प्राण यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले होते. 'डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है' यांसारखे संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या एकाच चित्रपटाने चंद्रा बारोट यांना भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर केले.
दिग्दर्शक चंद्रा बारोट त्यांच्या 'डॉन' चित्रपटाचा रिमेक बनवणारे चित्रपट निर्माते फरहान अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यावर दुःख व्यक्त केले आहे. चित्रपट निर्माते फरहान अख्तर, ज्यांनी २००६ मध्ये त्यांच्या 'डॉन' चित्रपटाचा रिमेक बनवला. त्यांनाही या बातमीने मोठा धक्का बसला आहे. फरहान यांनी इंस्टाग्रामवर चंद्रा बारोट यांची आठवण काढत लिहिले आहे की, "मूळ 'डॉन'चे दिग्दर्शक आता आपल्यात नाहीत, हे ऐकून खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना."
'डॉन'सारखा कल्ट-क्लासिक चित्रपट देण्याव्यतिरिक्त, चंद्रा बारोट यांनी अनेक उत्कृष्ट हिंदी चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले होते. त्यांनी मनोज कुमार यांच्या 'पूरब और पश्चिम', 'यादगार' आणि 'रोटी कपडा और मकान' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शन केले होते. चंद्रा बारोट यांनी बंगाली चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले होते. मात्र, ते स्वतः नेहमी म्हणायचे की, प्रेक्षक त्यांना केवळ आणि केवळ अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' चित्रपटासाठीच कायम लक्षात ठेवतील.
२००६ मध्ये जेव्हा फरहान अख्तर, चंद्रा बारोट यांच्या 'डॉन'चा रिमेक बनवत होते, तेव्हा त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. शाहरुखच्या 'डॉन'च्या प्रदर्शनापूर्वी एका जुन्या मुलाखतीत चंद्रा बारोट यांनी आनंद व्यक्त करत म्हटले होते की, "जेव्हा मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'डॉन' बनवत होतो, तेव्हा मला इतके मीडिया अटेन्शन मिळाले नव्हते. पण काळासोबत तो चित्रपट 'कल्ट' ठरला. फरहान अख्तरने तो पुन्हा बनवल्याचा मला आनंद आहे. मला असे वाटले की, अनेक वर्षांनंतर माझ्या कामाची पोचपावती मला मिळत आहे."
१९७८ साली प्रदर्शित झालेला 'डॉन' हा चित्रपट जबरदस्त ॲक्शन आणि दमदार संवादांसाठी ओळखला जातो. यात अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण यांसारखे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाची पटकथा सलीम-जावेद या जोडीने लिहिली होती. जवळपास ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता आणि आजही त्याची जादू कायम आहे.