मुंबई : पुढारी वृत्तसेवा
महात्मा गांधी यांची हत्या करणार्या नथुराम गोडसे याच्यावरील 'व्हाय आय किल गांधी' हा चित्रपट राज्यात प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करणारा हा चित्रपट आहे. भारत देशाची ओळख महात्मा गांधी यांच्या नावाने आहे. 30 जानेवारी ही महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळला जातो. तर दुसरीकडे घृणास्पद कृत्य करणार्या नथुराम गोडसे याच्यावरील चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित करण्यात येऊ नये, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.