Dharmendra Passed Away Pudhari
मनोरंजन

Dharmendra Passed Away: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dharmendra Passed Away: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते आणि “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन झाले असून चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Rahul Shelke

Dharmendra Death Bollywood Legend Passes Away 89:

बॉलीवूडचे दिग्गज आणि हिंदी सिनेमा जगतात “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. न्यूज एजन्सी IANS ने दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती.

अलीकडेच त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अनेक दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने कुटुंबीयांना आशा वाटू लागली होती.

दु:खाची बाब म्हणजे धर्मेंद्र पुढील महिन्यात, 8 डिसेंबरला, आपला 90वा वाढदिवस साजरा करणार होते. कुटुंबीयांनी त्यांच्या वाढदिवसासाठी विशेष तयारी केली होती.

या महिन्याच्या सुरुवातीला धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती. यामुळे कुटुंबीय अत्यंत नाराज झाले होते. हेमा मालिनी, ईशा देओल, सनी देओल यांनीसुद्धा या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती.

धर्मेंद्र हे केवळ अभिनेते नव्हते, तर एक निर्माता म्हणूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणे, लोकप्रिय आणि यशस्वी कलाकारांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. तब्बल 65 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि हिंदी सिनेमात सर्वाधिक हिट चित्रपट देणारा नायक म्हणून त्यांचा विक्रम आजही अबाधित आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने एक संपूर्ण युग संपले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT