Music composer Devi Sri Prasad to make his acting debut with film ‘Yellamma’
रॉकस्टार डीएसपी अर्थात देवी श्री प्रसाद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आगामी 'येल्लम्मा' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या वाढदिवशी नव्या प्रकल्पांची घोषणा किंवा खास सरप्राईझ देण्याची परंपराच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच परंपरेला पुढे नेत 'येल्लम्मा'च्या निर्मात्यांनी डीएसपीच्या चाहत्यांना आणि चित्रपटप्रेमींना ही खास भेट दिली आहे.
प्रदर्शित करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये डीएसपी 'पारशी' या व्यक्तिरेखेत दिसत असून, त्यांचा साधा पण प्रभावी लूक लक्ष वेधून घेतो. पट्टेदार शर्ट, काळी पँट आणि हातात अत्यंत आदराने धरलेला देवी येल्लम्माचा अलंकृत मुकुट असा त्यांचा अवतार आहे. चेहऱ्यावरील शांतता, जमिनीशी असलेली नाळ आणि अनुभवातून आलेली स्थिरता या व्यक्तिरेखेला वेगळेच वजन देताना दिसते.
फर्स्ट लूक शेअर करताना निर्मात्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "'येल्लम्मा'मध्ये एक असा माणूस आहे, ज्याचं नाव प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील-पारशी. रॉकस्टार डीएसपीला एका जमिनीशी जोडलेल्या भूमिकेत सादर करत आहोत. आतापर्यंत त्यांच्या संगीताचा उत्सव साजरा केला, आता त्यांच्या अभिनयाचाही तितक्याच उत्साहाने आनंद घ्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा, डीएसपी...पुढे काय येणार आहे, यासाठी जग अजून तयार नाही."
या चित्रपटातील 'पारशी' ही भूमिका डीएसपीसाठी केवळ एक व्यक्तिरेखा नसून त्यांच्या मनाशी जोडलेला भावनिक प्रवास असल्याचेही समोर आले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी त्यांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील त्यांचे दिवंगत वडिलांचे मूळ गाव वेदुरुपाका येथे भेट दिली. तेथे देवी येल्लम्माच्या सन्मानार्थ भरवल्या जाणाऱ्या अम्मोरू जत्रेत त्यांनी सहभाग घेतला, ढोल वाजवला, स्थानिकांसोबत नृत्य केले आणि वडिलांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत आशीर्वाद घेतला.
या अनुभवाबद्दल बोलताना डीएसपी म्हणाले, "त्या गावाच्या भेटीमुळेच मी 'येल्लम्मा'साठी होकार दिला. त्या प्रवासाने या भूमिकेशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं. फर्स्ट लूकमध्ये त्या भावनेची प्रत्येक छटा दिसते. पारशी ही व्यक्तिरेखा तिच्या साधेपणातच असामान्य आहे." 'येल्लम्मा'मधील डीएसपीचा हा पहिला लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून, त्यांच्या अभिनयाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.