Dhurandhar Box Office: बॉलिवूड दिग्दर्शक आदित्य धर यांचा चित्रपट धुरंधर बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरलेल्या ‘धुरंधर’ने जागतिक पातळीवर तब्बल 1100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या कमाईनंतरही चित्रपटाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला आहे.
CNN न्यूज 18 शी बोलताना ‘धुरंधर’चे वितरक प्रणब कपाडिया यांनी सांगितलं की, मिडल ईस्टमधील काही देशांत चित्रपट बॅन केल्यामुळे मोठा फटका बसला. “साधारण 90 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस तोटा झाला असावा. कारण अॅक्शन चित्रपट मिडल ईस्टमध्ये चांगली कमाई करतात,” असं त्यांनी सांगितलं.
प्रणब कपाडिया म्हणाले, “प्रत्येक देशाचे नियम, मतं आणि निर्बंध असतात; त्यांचा सन्मान करणं आवश्यक आहे. मिडल ईस्टमध्ये बॅन होणारा हा आमचा पहिलाच चित्रपट नाही. याआधीही काही भारतीय चित्रपट तिथे रिलीज होऊ शकले नव्हते. ‘धुरंधर’ तिथे प्रदर्शित व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न केले, पण ते शक्य झालं नाही. तरीही चित्रपटाने इतर देशांत चांगली कमाई केली.”
त्यांच्या मते, डिसेंबरमधील सुट्ट्यांचा काळही चित्रपटासाठी फायदेशीर ठरला. या काळात ओव्हरसीज प्रवास वाढतो, विशेषतः मिडल ईस्टमधून युरोप आणि अमेरिकेकडे. सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रेक्षकांनी वेळ काढून चित्रपट पाहिल्याने कमाईला हातभार लागला.
‘धुरंधर’ पाकिस्तान, बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि UAE मध्ये रिलीज झाला नाही. हे देश भारतीय चित्रपटांसाठी फायद्याचे मानले जातात. तरीही, या मर्यादा असूनदेखील ‘धुरंधर’ने जागतिक स्तरावर 1100 कोटींची कमाई केली आहे.