मनोरंजन

Honey Singh-Badshah Song Ban : ‘हनी सिंग-बादशहा’ला हायकोर्टाचा दणका, २० वर्षांपूर्वींच्या 'त्या' गाण्यावर बंदीचे आदेश

Honey Singh-Badshah vulgar song: 'स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू नाही!' : दिल्ली उच्च न्यायालय

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक हनी सिंग आणि बादशहा यांच्या 'वॉल्यूम १' (Volume 1) या दोन दशकं जुन्या गाण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत ते सर्व प्लॅटफॉर्मवरून तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. हे गाणे अत्यंत अश्लील, बीभत्स आणि महिलांचा अवमान करणारे असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने म्हटले आहे की, अशा प्रकारची कलाकृती महिलांकडे केवळ 'लैंगिक उपभोगाची वस्तू' म्हणून पाहण्याच्या मानसिकतेचे समर्थन करते, जे सुसंस्कृत समाजात कदापि स्वीकारार्ह नाही.

न्यायालयाचा तीव्र संताप

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर 'हिंदू शक्ती दल' या संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाने हे गाणे चेंबरमध्ये ऐकले आणि त्यातील मजकूर इतका आक्षेपार्ह असल्याचे आढळले की, गाण्याचे शीर्षकही न्यायालयाच्या आदेशात नमूद करणे उचित ठरणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, "हे अशा दुर्मिळ प्रकरणांपैकी एक आहे ज्याने न्यायालयाच्या विवेकाला मुळापासून हादरवून सोडले आहे. कलात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला थारा दिला जाऊ शकत नाही. हे गाणे केवळ अपमानजनकच नाही, तर स्त्रियांना केवळ एक 'वस्तू' म्हणून बघण्याच्या मानसिकतेचा प्रसार करणारे आहे." विशेषतः अल्पवयीन मुलांसाठी अशा प्रकारचा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असणे ही गंभीर बाब असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

'माफिया मुंदीर' या समुहाअंतर्गत २००६-०७ मध्ये हे गाणे प्रदर्शित झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हनी सिंग आणि बादशहा या दोघांनीही या गाण्याशी आपला संबंध नाकारला होता. मात्र, हिंदू शक्ती दलाच्या याचिकेनुसार, हे गाणे आजही यूट्यूबवर विविध नावांनी उपलब्ध असून त्याला लाखो व्ह्यूज मिळत आहेत. इतकेच नव्हे तर, १४ मार्च रोजी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात या गाण्यातील काही ओळी गायल्या गेल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

गुगल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना निर्देश

न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्र सरकार, सोशल मीडिया कंपन्या आणि संगीत क्षेत्रातील संबंधित कंपन्यांना हे गाणे सर्व स्वरूपात ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, या गाण्याचा कोणताही भाग मग तो ऑडिओ असो, व्हिडिओ असो किंवा गाण्याचे बोल असोत, सार्वजनिक स्वरूपात कुठेही उपलब्ध राहता कामा नयेत. सुनावणी दरम्यान गुगलच्या वकिलांनी माहिती दिली की, याचिकेत नमूद केलेले काही यूआरएल (URLs) आधीच हटवण्यात आले आहेत.

पुढील सुनावणी ७ मे रोजी

न्यायालयाने हनी सिंग आणि बादशहा यांना नोटीस बजावली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी निश्चित केली आहे. "कोणताही सुसंस्कृत समाज अशा प्रकारच्या कृतीला मुक्तपणे उपलब्ध राहण्याची किंवा त्यातून आर्थिक कमाई करण्याची परवानगी देऊ शकत नाही," अशा कठोर शब्दांत न्यायालयाने कलाकारांना फटकारले आहे.

न्यायालयाने याचिकाकर्त्यांना गाण्याशी संबंधित सर्व लिंक्सची (URLs) सूची तयार करून केंद्र सरकारला सादर करण्याची परवानगी दिली आहे, जेणेकरून तांत्रिक स्तरावर हे गाणे कायमचे ब्लॉक करता येईल. अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या गाण्यावर आता कायदेशीररित्या कायमची बंदी आल्याने संगीत क्षेत्रातील वाढत्या अश्लीलतेवर जरब बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT