करीना कपूर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘दायरा’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या क्राईम थ्रिलरमध्ये करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सत्य घटनांपासून प्रेरणा घेतलेल्या या चित्रपटातून गुन्हा, कायदा, न्याय आणि शिक्षेतील गुंतागुंत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चित्रपटात करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट केवळ गुन्ह्याची कथा न राहता कायदा, न्याय आणि शिक्षेच्या सीमारेषेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणार असल्याचं स्पष्ट होतं.
‘दायरा’मध्ये करीना कपूर डीसीपी अजुनी कोहली, तर पृथ्वीराज सुकुमारन डीसीपी रमन कुमारची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाभोवती फिरताना दिसते. ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक महिला आपल्या मुलीचा शोध घेताना दिसते. त्यानंतर कथानक अचानक गंभीर वळण घेतं.
पृथ्वीराजच्या ‘एनकाउंटर’मुळे सुरू होतो करीनाचा तपास
ट्रेलरची सुरुवात एका अस्वस्थ महिलेपासून होते. आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी ती धावपळ करताना दिसते. पृथ्वीराज सुकुमारन साकारत असलेला डीसीपी रमन कुमार एका गंभीर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचा तपास करत असतो. याचदरम्यान काही अल्पवयीन आरोपींना एका निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं दृश्य समोर येतं. त्यानंतर या घटनेला ‘एनकाउंटर’चं स्वरूप देण्यात आल्याचं ट्रेलरमध्ये दाखवलं आहे.
यानंतर करीना कपूरची एन्ट्री होते. ती डीसीपी अजुनी कोहलीची भूमिका साकारत असून पृथ्वीराजच्या पात्राने यापूर्वी केलेल्या तीन एनकाउंटर्सची चौकशी करण्याची जबाबदारी तिच्यावर येते. तपास जसजसा पुढे जातो, तसतसे या घटनांमागचं सत्य शोधण्याचा करीनाचा प्रयत्न अधिक गडद होताना दिसतो. करीना पडद्यावर येताच तपासाला वेग मिळतो. ती रमन कुमारने यापूर्वी केलेल्या तीन एनकाउंटर्सबाबतही त्याला प्रश्न विचारते. या कारवाया त्याने स्वसंरक्षणासाठी केल्याचा दावा केला जातो. मात्र, करीनाला या घटनांमागचं सत्य जाणून घ्यायचं असतं.
''एका कुटुंबाने पुन्हा आपली मुलगी गमावली आहे…''
तपासादरम्यान गुन्ह्याच्या ठिकाणाचं रिक्रिएशन केलं जातं. पृथ्वीराजच्या पात्राला त्याच्या कृतीबद्दल ताकीदही दिली जाते. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाची भावना दिसत नाही. उलट, ''एका कुटुंबाने पुन्हा आपली मुलगी गमावली आहे,'' असं तो म्हणताना दिसतो.
पृथ्वीराजच्या या भूमिकेला करीना प्रश्न विचारते. आरोपींपैकी एक जण अवघ्या १७ वर्षांचा होणार होता, याची ती त्याला जाणीव करून देते. त्यामुळे एका बाजूला भीषण गुन्ह्याची शिक्षा देण्याची गरज आणि दुसऱ्या बाजूला अल्पवयीन आरोपींसाठी असलेले कायदे, यांच्यातील संघर्ष चित्रपटाच्या कथेत पाहता येणार आहे.
कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय मिळतो का?
ट्रेलरच्या शेवटी करीना कायद्याच्या चौकटीत राहूनच आपलं काम करत असल्याचं सांगते. मात्र, पृथ्वीराज तिच्या भूमिकेला थेट आव्हान देतो. एखाद्या अल्पवयीन व्यक्तीने इतका गंभीर आणि अमानुष गुन्हा केला असेल, तर त्याला बाल न्याय कायद्याच्या संरक्षणाचा फायदा कसा मिळू शकतो, असा सवाल करण्यात येतो. त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा देताना कायद्याचं पालन महत्त्वाचं की पीडितेला न्याय मिळणं, हा मोठा प्रश्न ट्रेलरमधून उपस्थित राहतो.
करीना-पृथ्वीराज पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर
‘दायरा’चं सहलेखन आणि दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. ‘जंगली पिक्चर्स’ आणि ‘पेन स्टुडिओज’ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
करीनाचं २ वर्षांनंतर कमबॅक
‘दायरा’मधून करीना जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ती शेवटची २०२४ मध्ये अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम अगेन’मध्ये दिसली होती.