नागपूर : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट 'कोर्ट'मध्ये नारायण कांबळे ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते "वीरा साथीदार" यांचं कोरोनामुळे निधन झालं.कोरोना पॉझिटिव्ह असल्याने वीरा साथीदार यांना मागील आठवड्यात नागपूरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वाचा : BAFTA 2021 : प्रियांका चोप्राने बाफ्टा सोहळ्यात फक्त शर्ट घातला; आतमध्ये काहीचं…
वीरा साथीदार याची ओळख लेखक, कवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणूनही होती. त्यांचं बालपण अतिशय हालाखीत गेलं. मूळचे वर्धा जिल्ह्यातील असलेल्या वीरा साथीदार यांच बालपण नागपूरच्या जोगीनगर झोपडपट्टीत गेलं. त्यांचे वडील हमाल म्हणून काम करत होते तर आई मजुरीचं काम करत होती. अत्यंत हलाखाच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले.
वीरा साथीदार यांनी दलित आणि मागासवर्गीयांमध्ये चेतना जागृत करण्यासाठी अनेक गीत रचली आणि गायली. 'विद्रोही' नावाच्या मासिकाचे संपादन केले. 'रिपब्लिकन पँथर' संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. विशेष म्हणजे २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कोर्ट' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर, परदेशी भाषा चित्रपट श्रेणीत भारताकडून तो ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता.