पुढारी ऑनलाईन डेस्क - यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात बालदिनाच्या निमित्ताने अल्ट्रा झकास (मराठी ओटीटी) आणि अल्ट्रा प्ले (हिंदी ओटीटी) या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मालगुडी डेज आणि अन्य शो पाहायला मिळणार आहे.
या महोत्सवात चिमुकल्यांसाठी गाजेलेली मालिका आणि चित्रपट उपलब्ध असतील. हा महोत्सव महिनाभर सुरू राहणार असून ५० क्लासिक बालचित्रपट यामध्ये दाखविण्यात येणार आहेत.
आर. के. नारायण यांनी ग्रामीण भारतीय जीवनाचे दर्शन घडविलेल्या व लहान मुलांच्या साहसी भावविश्वावर आधारित कथांचा समावेश असलेल्या 'मालगुडी डेज' चाही यात समावेश आहे.
या प्लॅटफॉर्म्सवर 'मालगुडी डेज' हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल.
'मालगुडी डेज' ही मालिका या बालचित्रपट महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. 'मालगुडी डेज' ही मालिका म्हणजे भारतातले बालपण आणि छोट्या शहरांच्या मोहकतेचं सार सुंदरपणे मांडणारे अजरामर रत्न आहे.
'मालगुडी डेज' ही मालिका विशेषतः 'जेन झी' पिढीला एक वेगळा आनंद देईल. यासोबतच 'बाल गणेश', 'पवनपुत्र हनुमान', 'बाल हनुमान', 'जलपरी - द डेझर्ट मर्मेड', 'सुपरहिरो बेबी पांडा', 'बूनी बियर्स सीरिज', 'स्नोक्वीन ३ - फायर अँड आइस', 'द मॅजिक ब्रश' यांसारख्या चित्रपटांचा देखील आनंद प्रेक्षकांना घेता येईल.