पुढारी ऑनलाईन डेस्क - हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री छाया कदम हे नाव चांगलच गाजतं आहे. त्यांची भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. त्याशिवाय अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आहे. आता छाया कदम 'स ला ते स ला ना ते' या आगामी ७ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.
स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनीआरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे आहेत.
वृत्तवाहिनीचा रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी तरुणी यांची अनोखी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या प्रेमकहाणीत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येतात. त्यात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरते. या पोलिस अधिकाऱ्याला छाया कदम यांनी त्यांच्या शैलीत अतिशय उत्तमप्रकारे न्याय दिला आहे. प्रत्येक भूमिकेत आपल्या अभिनयाचं वेगळेपण त्यांनी अधोरेखित केलं आहे. त्यामुळे "स ला ते स ला ना ते" या चित्रपटात त्यांचा पोलिस अधिकारी किती भाव खातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.