पुढारी ऑनलाईन डेस्क : विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' चित्रपटाच्या बंपर कमाईने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच्या २२ व्या दिवशी (Chhaava box office collection Day 22) 'छावा'ने ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपटाने प्रेक्षकांचे मने जिंकली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, 'छावा'ला #Chhaava बॉक्स ऑफिसवर मिळालेला प्रतिसाद कायम आहे. त्याचे चौथ्या शुक्रवारी कलेक्शन तिसऱ्या मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारपेक्षा जास्त झाले. ज्यामुळे शनिवारी त्याची दुहेरी अंकी कमाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हिंदीमधील रिलीजच्या तीन आठवड्यानंतर शुक्रवारी तेलुगूमध्ये 'छावा' रिलीज झाला. त्याला ओपनिंगलाच चांगला प्रतिसाद मिळाला. 'छावा'ने तेलुगूमध्ये शुक्रवारी २.६३ कोटींची कमाई केली.
'छावा'ने हिंदी भाषेत चौथ्या आठवड्यात शुक्रवारी ६.३० कोटींची कमाई केली. यामुळे भारतातील या चित्रपटाची कमाई एकूण ५०२.७० कोटी झाली आहे. त्याने ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केल्याने पुष्पा २, जवान, स्त्री २, पठाण, बाहुबली २ आणि ॲनिमल सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
दरम्यान, छावाने जगभरातील कमाईत ६५० कोटींचा टप्पा पार केला आहे.