कोल्हापूरचे प्रसिध्द मराठी अभिनेते चंद्रकांत मांडरे यांचा आज दि. १७ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. एक उत्तम अभिनेते आणि चित्रकार अशी त्यांची ख्याती. आजही कोल्हापुरातील राजारामपुरीत त्यांच्या नावाचे म्युझियम आहे. खरंतरं त्यांचे हे राहते घर होते. पुढे ते वस्तू संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले. डॉ. चंद्रकांत मांडरे यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांतून बहरदार सादरीकरण, अभिनय कौशल्य दाखविले .
युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, संथ वाहते कृष्णामाई, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी अशा चित्रपटांतून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अधिक उंचीवर नेले. चंद्रकांत यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ ला कोल्हापुरात झाला.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या हाताखाली ते नोकरी करू लागले. तर बाबा गजबर यांच्याकडून चित्रकलेचे शिक्षण घेतले. आजही त्यांनी काढलेली चित्रे त्यांच्या म्युझियममध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या चित्रात रंगसंगतीबरोबर, निसर्गाची किमया पाहायला मिळते. झाडे, पक्षी, शेती, नदी, फुले, निसर्गाशी संबंधित त्यांची चित्रे लक्ष वेधून घेतात.
पेंटरांबरोबर काम करता करता त्यांना 'सावकारी पाश' हा बोलपट मिळाला. या बोलपटातून त्यांचे अभिनय बहरू लागले. मराठी सिनेसृष्टीला नवा देखणा अभिनेता मिळाला होता. याचवेळी त्यांची भालजी पेंढारकर यांच्याशी जवळीक झाली. मुळचे गोपाळ असे नावात बदल करून त्यांचे चंद्रकांत असे नाव ठेवण्यात आले. अद्यापपर्यंत चंद्रकांत मांडरे असेच त्यांचे नाव प्रसिध्द आहे. तर धाकटा भाऊ वामन हे सूर्यकांत मांडरे झाले.
पाटील, जल मल्हार, ईर्ष्या, अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध व्यक्तीरेखांच्या सर्व रंगछटा त्यांनी साकारल्या. ७७ मराठी, १४ हिंदी आणि एका इंग्रजी चित्रपटात काम करणाऱ्या चंद्रकांत यांची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द अविस्मरणीय आहे.
गावातल्या बायांवर डोळा ठेवणारा रंगेल 'पाटील' साकारणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची अजरामर भूमिका साकारणारे ते घरंदाज, रुबाबदार, देखणे चंदकांत मांडरेचं होय. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्याबरोबर २७ चित्रपटांत चंद्रकांत यांनी एकत्र भूमिका केल्या.
कोल्हापूरच्या चित्रनगरीला कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे नाव देण्यात यावे, ही त्यांची पहिल्यापासून मागणी होती.
चंद्रकांत मांडरे कलादालन
आपल्या चित्रांचे एक स्वत:चे दालन असावे, असे त्यांचे महाराष्ट्र फिल्म कंपनीत असल्यापासूनचे स्वप्न आहे. पुढे त्यांनी कोल्हापुरात राजारामपुरीत बंगला बांधला. या बंगल्याला निसर्ग हे नाव दिले. या बंगल्यात त्यांनी स्वत:ची सगळी निसर्गचित्रे लावून कलादालन सजवले.
चंद्रकांत यांचा शेवटचा चित्रपट बनगरवाडी होता. त्यावेळी ते ८२ वर्षांचे होते. शूटिंग नसेल तेव्हा ते चित्रे काढायचे. आम्ही त्यांना दादा म्हणायचो, अशी आठवण त्यांच्या आतेभावाने सांगितली होती, असा संदर्भ संपादक अनंत दीक्षित यांच्या चंद्रकांत पुस्तकात मिळतो.
शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २००१ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरीच हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
(photos – Late Dr. Chandrakant Mandare 100th Birth Year Celebration facebook वरून साभार)
संकलन : स्वालिया शिकलगार, पुढारी ऑनलाईन डेस्क
पुढारी ऑनलाईनवर आमचे ब्लॉगदेखील वाचा – click करा : https://www.pudhari.news/blog.php या लिंकवर