Sharad Upadhye on Nilesh-Sable
मुंबई - ज्योतिष अभ्यासक, लोकप्रिय राशीचक्रकार शरद उपाध्ये यांची एक फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमावरून त्यांनी या शोचे सूत्रसंचालक नीलेश साबळे यांच्यावर निशाणा साधलाय. उपाध्ये यांनी फेसबूकवर मोठी पोस्ट लिहून त्यांच्यासोबतचा घडलेला एक किस्सा सांगितला आहे. उपाध्ये यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिल्यानंतर यावर सोशल मीडिया युजर्सकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहुया.
चला हवा येऊ द्या हा शो लोकप्रिय ठरला होता. या शोचं सूत्रसंचालन नीलेश साबळे यांनी केलं होतं. काही काळ ब्रेकनंतर पुन्हा एकदा हा शो येत आहे. शोमध्ये काही बदल होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांनुसार, डॉ. निलेश साबळे हे सोमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अभिनेता अभिजीत खांडकेकर दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.
दरम्यान, हे वृत्त समोर आल्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी शोमध्ये त्यांना आलेले वाईट अनुभव सांगितले. ज्या प्रकारे चला हवा येऊ द्याच्या शोमध्ये आणि पडद्यामागे त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, याबद्दलही त्यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
''आदरणीय नीलेशजी साबळे,
''आपल्याला हवा येऊ द्याच्या दुस-या पर्वातून डच्चू देऊन त्या जागी अभिजीत खांडकेकरना आणल्याची बातमी आज पेपरमध्ये वाचली.वाईट वाटले पण आश्चर्य नाही. मला तुम्ही एकदा बोलवले होते. त्याप्रमाणे मी ११ वा.पोहोचलो.पण ३ वाजेपर्यंत त्या रुममध्ये कोणीच फिरकले नाही. मला पाणी हवे होते पण एकादोघांना सांगूनही ते आणतो म्हणून गेले ते आलेच नाहीत. मला रुम सोडू नका असे सांगीतले होते.''
''नीलेश तुम्ही इतर कलावंतांच्या रुम मध्ये जाऊन गप्पा मारीत होतात पण माझ्या रुममध्ये डोकावलात ते थेट ४ वा.स्माईलही न देता स्टेजवर गेलात.इतरांचे शूटिंग खूप वेळ केलेत पण मला ६ वा. बोलावून घाईघाईत १५ मिनिटात सारे आटोपले. त्यावेळीही इतर कलावंत मधेमधे बोलत होते.माझा सारा दिवस फुकट गेला.एडिटींग मध्येही माझी उत्तरे गाळलीत. बाहेर आपली भेट झाली तेंव्हा वडीलांच्या नात्याने काही सल्ले दिले. पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली होती.दुस-याच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होतात. त्याच वेळी मला वाटले की अहंकार अति वाईट.गर्विष्ट माणसाचे अध:पतन होते.''
''एखादी पोस्ट मिळाली की ताठा येतो आणि सर्वनाश होतो. स्टेजवर तुम्ही सा-यांना आपलेसे केले नाही. आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते. या सा-याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनेलने बाहेर काढले. नीलेशजी स्वभाव मनमिळाऊ असावा सा-यांना सांभाळून घ्यावे मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल. अभिजीत खांडकेकर ही धुरा चांगली सांभाळतील. मला त्यांचा सहवास मिळाला आहे. आपण अनुभवी आहात. त्यांना मार्गदर्शन करा. इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्या चांगल्या कामाने दूर करा. आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती.''
एका युजरने म्हटलंय- "अती तिथं माती या न्यायाने आम्ही फार काळापासून हा कार्यक्रम बघणे बंदच केले होते. सगळा पांचटपणा न् काय? पण निमंत्रित पाहुणे अन् ते देखील उपाध्ये गुरुजींसारखे अनेकांच्या गुरुस्थानी असलेले व्यक्तिमत्व आपल्या कार्यक्रमात आलेले असतांना असे कोण कसे वागू शकते हेच समजनेनासे झालेय. विनाशकाले विपरीत बुध्दी म्हणतात ते हेच असावे बहुतेक...'' आणखी एका युजरने लिहिलंय- ''शरद जी योग्य पद्धतीने कान उपटले. टेलिव्हिजन माध्यमांवर काही लोक स्वतः प्रसिद्धीसाठी येतात. पण काही लोकांमुळे त्या माध्यमाला, त्या कार्यक्रमाला प्रसिद्ध मिळते .अशा लोकांपैकी पैकी तुम्ही होतात. त्यामुळे तुमच्याबद्दल दाखवलेली बेफिकिरी अक्षम्यच होती तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून आतापर्यंत हे सत्य जाहीर केलं नव्हतं. किमान निलेश साबळे यांना आता तरी कळावं ,यापुढे कसं वागायचं ते'.'
''आम्ही सर्व कुटुंब मिळुन हा कार्यक्रम मागिल दोन वर्षे झाली पाहत नाहीत...अजीबात आपुलकी नाही या कार्यक्रमात..तुम्ही योग्य बोललात..तुम्हाला एवढा त्रास होउनही, तुम्ही चांगलेच सांगतात..हा खरा मनाचा मोठेपणा आहे. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा..हा सुंदर कार्यक्रम आहे. संपूर्ण कुटुंब पाहु शकतोय.''
''साड्या नेसणारे कलाकार बघवेनासे झाले म्हणूनच कार्यक्रम बघणे सोडले .तुमच्यासारख्या वयाने ,अनुभवाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी असे वागणे अशोभनीय!'' अशा असंख्य प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.