सध्या एकापेक्षा एक दिग्गज कलाकारांच्या साक्षीने कान्स चित्रपट महोत्सव फुलत चालला आहे. सारा अली खानपासून ईशा गुप्तापर्यंत अनेक अभिनेत्रींनी कान्समध्ये आपला लूक रीविल केला असून आता याच मांदियाळीत अनुष्का शर्मादेखील सहभागी होणार आहे. अनुष्का कान्स महोत्सवात सहभागी होण्यासाठी रविवारी रवाना झाली असून तिच्यासाठी हे कान्समधील पदार्पणाचे वर्ष असेल.
जागतिक स्तरावरील सर्वात बडे फिल्म फेस्टिव्हल म्हणून कान्स वाखाणले जाते. यंदा या महोत्सवात अनेक भारतीय अभिनेत्रींनी पदार्पण नोंदवले असून लवकरच अनुष्काही यात सहभागी होईल. कान्समध्ये आतापर्यंत उर्वशी रौतेला, ऐश्वर्या राय-बच्चन, ईशा गुप्ता, सारा अली खान, मानुषी छिल्लर व मृणाल ठाकरे यांनी लक्ष वेधून घेतले. आता अनुष्का शर्मा या स्टारडमचा भाग होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाली आहे. अनुष्काचा रेड कार्पेटवरील लूक कसा असेल, याची अवघ्या बॉलीवूड टाऊनला उत्सुकता आहे.
यादरम्यान तिचा एक व्हिडीओ आला असून त्यात तिने काळ्या रंगाची ट्रॅक पँट व व्हॉईट क्रॉप टॉप परिधान केला आहे. हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. मात्र, यावेळी अनुष्काने माध्यमांशी संवाद साधणे टाळले आणि सरळ विमानतळावर जाणे पसंत केले. यंदा कान्स महोत्सवात सारा अली खान इंडियन लूकमध्ये दिसून आली, तर उर्वशी रौतेला नेकलेस व ब्ल्यू शेड लिपस्टिकसह चर्चेत राहिली. ऐश्वर्या राय-बच्चनच्या हुडी गाऊनवरदेखील अनेक प्रतिक्रिया आल्या. आता साहजिकच, अनुष्काचा लूक कोणता असेल, याची उत्सुकता असणार आहे.