bollywood john abraham ambanis fitness trainer says i worked as a watchman built a rs 15 cr gym
मुंबई : पुढारी ऑनलाईन
येथे आम्ही तुम्हाला मोठमोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटींच्या त्या फिटनेस ट्रेनरशी ओळख करून देत आहोत, ज्यांचं म्हणणं आहे – “मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासमोर एक ट्रेनर म्हणून उभा राहीन.”
ही गोष्ट आहे जॉन अब्राहमसारख्या अभिनेत्यांच्या फिटनेस ट्रेनरची, ज्यांनी कधी काळी वॉचमनचे काम केले होते. अनेक वर्षे त्यांनी अत्यंत कष्टात आयुष्य काढले. मात्र पुढे असा काळही आला की ते महिन्याला ३ ते ५ लाख रुपये कमवू लागले.
जॉन अब्राहमचे हे फिटनेस ट्रेनर अंबानी कुटुंबाचेही फिटनेस ट्रेनर राहिले आहेत. हे आहेत सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना, ज्यांनी जॉन अब्राहमसोबतच अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, अर्जुन रामपाल अशा अनेक दिग्गज कलाकारांना ट्रेनिंग दिली आहे.
विनोद चन्ना यांनी सांगितले की, एक वेळ अशी होती की त्यांच्या जवळ चप्पलची एक जोडीही नव्हती, आणि आज ते मुंबईत १५ कोटी रुपयांचा जिम तसेच ५–६ घरांचे मालक आहेत. विनोद यांनी आपल्या संपूर्ण संघर्षाची कहाणी सांगितली.
विनोद चन्ना हे मजूर कुटुंबातून आले आहेत
सध्या अंबानी कुटुंबाला ट्रेनिंग देणारे प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी अलीकडेच त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. त्यांनी जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांना फिटनेस ट्रेनिंग दिले आहे.
विनोद हे एका मजूर कुटुंबातून आले असून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात चौकीदार (वॉचमन) म्हणून केली होती. मात्र बॉडीबिल्डिंगची आवड असल्याने ते फिटनेस ट्रेनिंगकडे वळले. अनेक वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर ते अंबानी, बिर्ला यांसारख्या मोठ्या कुटुंबांचे आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींचे ट्रेनर बनले.
‘लहानपणी मी कधी चप्पलही घालत नव्हतो’
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, “मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासमोर ट्रेनर म्हणून उभा राहीन. लहानपणी मी कधीच चप्पल घालत नव्हतो. मी दादरमधील अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहे.”
मोठे क्लायंट मिळवण्यासाठी बांद्राला आलो
विनोद यांनी सांगितले की, त्यांनी मुंबईतील एका जिममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून काम सुरू केले होते. सेलिब्रिटी ट्रेनर होण्याआधी त्यांनी १५ वर्षे बॉडीबिल्डिंग केली.
ते म्हणाले, “१०–१५ वर्षे सातत्याने मेहनत केली, तेव्हाच अशा संधी मिळतात.”
१२ वर्षे ज्या जिममध्ये काम केले, तो जिम त्यांनी सर्व क्लायंटसह सोडला, कारण त्यांना अधिक पैसे कमवायचे होते. मोठ्या क्लायंटसाठी त्यांनी बांद्रा येथे जाण्याचा निर्णय घेतला.
‘रितेश देशमुखच्या नातेवाइकाने मला पाहिले’
बांद्रातील जिमच्या मॅनेजरने त्यांना ओळखले आणि संधी दिली, ज्यातून त्यांच्या सेलिब्रिटी ट्रेनर कारकिर्दीची सुरुवात झाली. विनोद म्हणाले, “मी बांद्रामध्ये शून्यापासून सुरुवात केली. माझ्याकडे एकही क्लायंट नव्हता. जिममध्ये जो कोणी भेटायचा, मी त्याला ट्रेनिंग द्यायचो. नंतर रितेश देशमुख यांच्या एका नातेवाइकाने मला पाहिले आणि त्यांनी माझी शिफारस केली.”
‘५–६ घरे घेतली, १५ कोटींचा जिम विकत घेतली’
रितेशसोबतचा प्रवास हा त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. ‘फोर्स’ चित्रपटासाठी जॉन अब्राहमला ट्रेनिंग देतानाचा काळ आठवताना ते म्हणाले, “तो माझ्या करिअरचा सर्वोच्च काळ होता. मी एका तासासाठी २५,००० रुपये घेत होतो. त्याच वेळी अनन्या बिर्लांनी यांनीही माझ्याशी संपर्क साधला आणि त्या मला अधिक पैसे देत होत्या.” करिअरच्या शिखरावर असताना ते दिवसाला १६ तास काम करत होते. ते पुढे म्हणाले, “मी ५–६ घरे घेतली आणि १५ कोटी रुपयांचा जिम विकत घेतला.”
ईशा, अनंत आणि आकाश अंबानी यांनाही दिले ट्रेनिंग
विनोद चन्ना यांनी ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी यांनाही ट्रेनिंग दिली आहे. विशेष म्हणजे, अनंत अंबानी यांनी १८ महिन्यांत १०८ किलो वजन कमी केले, त्या फिटनेस प्रवासात विनोद चन्ना यांचीही महत्त्वाची भूमिका होती.