पुढारी ऑनलाईन डेस्क : Sidharth Malhotra Kiara Advani : नुकतीच सिद्धार्थ मल्होत्राच्या एका महिला चाहत्याची लाखोंची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्याच्या फॅन पेजने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या, ज्यामुळे एक चाहती त्यांच्या जाळ्यात अडकली आणि 50 लाख रुपयांची मोठी फसवणूक झाली. असा दावा फसवणूक झालेल्या चाहतीने केला असून सिद्धार्थ मल्होत्राही त्या फॅन पेजला फॉलो करतो असे म्हटले आहे. पीडित चाहतीने अनेक ट्विट केले आहेत ज्यात तिने आपल्यासोबत झालेल्या कथित फसवणुकीबद्दल सांगितले आहे. तसेच ती या फसवणुकीत कशी अडकली हेही सांगितले. मीनू वासुदेव असे या चाहतीचे नाव असून ती अमेरिकेत राहते.
अनेक ट्विटमध्ये स्वतःची ओळख करून देताना मीनूने ही घटना तसेच फसवणूक करणाऱ्या व्यक्तीसोबत केलेले चॅट शेअर केले आहेत. 2023 मध्ये सिद्धार्थची ही चाहती लाखोंच्या फसवणुकीची बळी ठरली. एक्स यूजर @desi_girl334 ने म्हटले आहे की, ‘प्रिय @sidmalhotra आणि सर्व सिडियन, माझे नाव मीनू वासुदेवन आहे आणि मी अमेरिकेत राहते. तुम्हाला ॲडमिन अलीजा आणि हुस्ना परवीन यांच्याशी संबंधित एका घटनेबद्दल सांगायचे आहे. ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान त्यांनी माझी 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. 18-24 ऑक्टोबर 2023 दरम्यान, त्यांनी माझी यूकेमधील मैत्रिण मारिया हिचीसुद्धा 10.5 हजार रुपयांची फसवणूक केली. या कालावधीतील काही चॅट त्यांनी काढून डिलिट केले आहेत. तथापि, माझ्याकडे पुरावा म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.’
मीनू वासूदेवन यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘अलिजाने मला खोट्या गोष्टी सांगितल्या, कियारामुळे सिद्धार्थचा जीव धोक्यात आला. कियाराने सिद्धार्थला तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. याशिवाय कियाराने सिडच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी दिली होती. कियारा आणि तिच्या इतर सर्व सहकलाकारांनी सिडची फसवणूक केली आणि त्याच्यावर काळी जादू केली. तसेच, कियारा आणि धर्माच्या क्रू मेम्बर्सनी सिद्धार्थच्या बँक खात्याचा पूर्ण ताबा घेतला आणि त्याच्या कुटुंबाला बँक पासवर्ड आणि स्वाक्षरी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हे सर्व मला अलिझाने सांगितले. तसेच या प्रकरणात सिडला वाचवण्यासाठी मदत मागितली. यादरम्यान अलीजाने माझी ओळख दीपक दुबे (@magical_master_of_mumbai) यांच्याशी करून दिली, जो सिडच्या बनावट पीआर टीमचा सदस्य होता. त्यानंतर दुबेने माझी ओळख किआराच्या टीममधील राधिकाशी (@sidharthdefender) करून दिली. राधिका मला सिड आणि कियाराच्या प्रत्येक हालचालीची माहिती देत असे. मी त्याला माहिती मिळवण्यासाठी आणि सिडशी बोलण्यासाठी दर आठवड्याला पैसे द्यायला सुरुवात केली.’
हे प्रकरण समोर आल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिद्धार्थने लिहिले की, मला समजले आहे की वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फसवणूक सुरू आहे. लोक माझ्याशी किंवा माझ्या टीमशी संबंधित असल्याचा दावा करत आहेत आणि पैसे मागत आहेत. मी ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छितो की मी आणि माझे कुटुंब किंवा टीम यापैकी कोणत्याही गोष्टीला समर्थन देत नाही.
सिद्धार्थने लिहिले की, जर कोणाला असे कॉल किंवा मेसेज आले तर त्यांनी तक्रार नोंदवावी आणि चुकीची माहिती पसरवणे टाळावे. माझे चाहते माझी सर्वात मोठी ताकद आहेत आणि तुमचा विश्वास आणि सुरक्षितता माझ्यासाठी सर्वोपरि आहे.’