Disha Patani:
उत्तर प्रदेश : अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची जबाबदारी गोल्डी ब्रार गँगने घेतली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी तिचे वडील जगदीश पटानी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
या घटनेमागे दिशाची लहान बहीण खुशबू पाटनीने जुलैमध्ये अनिरुद्धचार्य यांच्या विरोधात इंस्टाग्रामवर अपमानजनक टिप्पणी केल्याचे कारण आहे. ही टिप्पणी सुरुवातीला प्रेमानंद महाराज यांच्याशी जोडली गेली, परंतु खुशबूने व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले की तिची टिप्पणी फक्त अनिरुद्धचार्य महाराज यांच्यासाठी होती.
या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यात गोळीबाराची जबाबदारी ढेलाना बंधू, वीरेंद्र आणि महेंद्र यांनी स्वीकारली आहे. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. पोस्टमध्ये म्हटलंय की, "सर्व भावांना राम राम. मी वीरेंद्र चरण, महेंद्र सरन. भावांनो, आज दिशा पटानीच्या घरावर जो गोळीबार झाला, तो आम्ही केला आहे. तिने आमच्या पूज्य संतांचा (प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धचार्य महाराज) अपमान केला आहे. तिने आपल्या सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. आमच्या देवांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माचा अनादर केला, तर त्यांच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही."
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, "हा संदेश फक्त तिच्यासाठीच नाही, तर चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांसाठी आणि त्यांच्याशी संबंधित लोकांसाठीही आहे. भविष्यात जो कोणी आपल्या धर्माचा आणि संतांचा असा अपमान करेल, त्याने परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार राहावे. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जायला तयार आहोत. आम्ही कधीही मागे हटणार नाही. आमच्यासाठी, आपला धर्म आणि समाज एक आहे आणि त्यांचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे."
पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी हल्ल्यापूर्वी दिशा पाटनीच्या घराची रेकी केली होती. मोटरसायकलवर आलेल्या दोन जणांनी गोळीबार केला. हे हल्लेखोर दिल्ली-लखनऊ महामार्गाने बरेलीत घुसले, निवासस्थानाजवळ गोळीबार केला आणि ७-८ मिनिटांत त्याच महामार्गाने शहराबाहेर पडले. पोलीस अभिनेत्रीच्या घरातील आणि महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हल्लेखोर बाहेरचे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू आहे आणि या घटनेत सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.