film Bol Bol Rani teaser out  Instagram
मनोरंजन

film Bol Bol Rani|पहिली झलक ठरली दमदार; रहस्य, सस्पेन्स अन् थराराचा संगम! ‘बोल बोल राणी’चा ट्रेलर पाहाच

film Bol Bol Rani|पहिली झलक ठरली दमदार; रहस्य, सस्पेन्स अन् थराराचा संगम! ‘बोल बोल राणी’चा ट्रेलर पाहाच

स्वालिया न. शिकलगार

‘बोल बोल राणी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातील रहस्यमय वातावरण, सस्पेन्स आणि प्रभावी दृश्यरचना यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ट्रेलरमध्ये कथानकाची झलक देण्यात आली असली तरी अनेक रहस्ये कायम ठेवण्यात आली आहेत.

अपहरण, खून, संशय आणि एकामागून एक उलगडणारी रहस्ये... अशा थरारक कथानकाची झलक दाखवणाऱ्या 'बोल बोल राणी' या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रहस्य, सस्पेन्स आणि वेगवान घडामोडींनी भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. प्रत्येक दृश्यातून नवे प्रश्न निर्माण होत असल्याने चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

ट्रेलरमध्ये सई ताम्हणकर एका गूढ आणि वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. संपूर्ण कथा तिच्या व्यक्तिरेखेभोवती फिरत असल्याचे संकेत मिळतात. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागचे सत्य काय आहे, ती या रहस्याची बळी आहे की सूत्रधार, याचे उत्तर या व्हिडिओतून मिळत नाही. त्यामुळे तिच्या भूमिकेभोवतीचे गूढ अधिकच गडद होते.

दुसरीकडे सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या व्यक्तिरेखाही तितक्याच संशयास्पद दाखवण्यात आल्या आहेत. प्रत्येक पात्र काही ना काही लपवत असल्याची भावना ट्रेलरमध्ये सातत्याने जाणवते. त्यामुळे प्रत्येक ट्विस्टनंतर प्रेक्षकांचा अंदाज बदलत राहतो.

चित्रपटाचे दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, 'बोल बोल राणी'च्या ट्रेलरमधून आम्ही कथानकाची फक्त एक झलक दाखवली आहे. प्रत्येक पात्राकडे एक गुपित आहे आणि प्रत्येक वळण प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देईल. सई ताम्हणकरची भूमिका तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वांत वेगळ्या भूमिकांपैकी एक ठरणार आहे.

'न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड' प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली यांनी केली आहे. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बोल बोल राणी' हा रहस्य आणि सस्पेन्सने भरलेला चित्रपट १७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT