पुढारी ऑनलाईन डेस्क
सौंदर्याची खाण असणारी अश्विनी भावे मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेलं नाव. एक मराठमोळी अभिनेत्री असण्याबरोबरचं अश्विनी यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करून सिनेरसिकांच्या मनावर रुंजी घातली. नव्वदीच्या दशकात आपल्या उत्तम अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. आज ७ मे रोजी अश्विनी भावे यांचा वाढदिवस होय. या औचित्याने त्यांना जीवनप्रवास थोडक्यात जाणून घेऊया.
अश्विनी यांचा जन्म ७ मे, १९७२ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांची आई उषा भावे मुंबईमध्ये साधना विद्यालयात कार्यरत होत्या. अश्विनी यांना एक भाऊ आहे. अश्विनी यांनी मुंबईतील रूपारेल कॉलेजमधून पदवी घेतली.
मॉडेल ते अभिनेत्री…
अश्विनी यांनी एक थिएटर कलाकार म्हणून आपले करिअर सुरू केले होते. अनेक मराठी आणि हिंदी थिएटर नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. त्यांनी मॉडेलिंग म्हणूनही काम केले. पुढे त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपले बस्तान बसवले. १९८६ मध्ये त्यांनी मराठी 'शाबास सुनबाई'मधून डेब्यू केलं. या चित्रपटातील त्यांची भूमिका कौतुकास्पद ठरली. त्यानंतर त्यांना कधीचं मागे वळून पाहावे लागले नाही. धडाकेबाज (१९९०) या चित्रपटात त्यांनी पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. 'अशी ही बनवा बनवी' (१९८८) मध्ये त्यांची अशोक सराफ यांच्यासोबतची जोडी अफलातून ठरली होती. पुढे 'कळत नकळत' (१९८९), 'कडचिट'(२००७), ''मांजा' (२०१७), 'वझीर', 'आहुती', 'घोळात घोळ', 'हळद रुसली कुंकू हसलं,' 'एक रात्र मंतरलेली' यासारखे एकापेक्षा एक चित्रपट त्यांनी केले.
हिंदी चित्रपटांमध्ये 'मेंहदी' (१९९१), 'हनीमून' (१९९२), 'सैनिक' (१९९३), 'पुरुष' (१९९४), 'जख्मी दिल' (१९९४) आणि 'यक्षपुरुष' (१९९८) असे चित्रपट केले. सैनिक चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारसोबत तिने केलेला अभिनय वाखाणण्याजोगे होता. ऋषी कपूरसोबत 'हिना' चित्रपटातही त्या झळकल्या. अश्विनी यांच्यावर चित्रीत झालेलं 'देर ना हो जाये' हे गाणं लोकप्रिय ठरलं होतं.
अश्विनी भावे लोकप्रिय ठरल्या त्या 'अंतरिक्ष' या मालिकेतून. त्या काही कन्नड चित्रपटांमध्येही दिसल्या. यामध्ये 'श्रवगदा सरदारा' (१९८९), 'विष्णू विजया' (१९९३), आणि 'रंगनेहलियेज रंगदा रंगगोडा' (१९९७) चित्रपटांचा समावेश आहे.
त्या निर्मात्यादेखील आहेत. २००२ मध्ये त्यांनी आपले पहिले वृत्तचित्र फिल्म वारली आर्ट अँड कल्चर हे मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित केले. २००७ मध्ये पुरस्कार विजेता मराठी चित्रपट 'कदाचित'ची निर्मिती केली.
नृत्याची आवड
अश्विनी यांना स्वयंपाक करणे, वाचायला आवडते. विशेष म्हणजे त्यांना नृत्याची आवड आहे.
अमेरिकेत स्थायिक
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले किशोर बोपर्डिकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या यूएसएमध्ये शिफ्ट झाल्या. त्यांना एक मुलगा समीर आणि एक मुलगी साची आहेत.
लिंबू कलरच्या साडीचा किस्सा
अशी ही बनवा बनवी चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी हा चित्रपट खूप गाजला. आजही हा चित्रपट सदाबहार ठरला आहे. चित्रपटाला ३२ वर्षे उलटून गेली असली तरी आजही या चित्रपटातील अनेक डायलॉग्ज आणि प्रसंग प्रेक्षकांच्या मनात घर केले आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि शंतनू माने अर्थातच सिध्दार्थ रे, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता जोशी-सराफ या दिग्गज कलाकारांसोबत अश्विनी भावे झळकल्या होत्या. यामध्ये अशोक सराफ यांच्या बॉसची भूमिका अश्विनी यांनी साकारली होती.
अशोक सराफ त्यांना लिंबू कलरची साडी सुचवतात आणि दुसऱ्या दिवशी लिंबू कलरची साडी नेसून अश्विनी आल्यानंतर अशोक सराफ यांनी त्यांच्या सौंदर्याचं केलेलं वर्णन आजही सिनेरसिकांच्या मनात घर करून गेलं आहे. 'मॅडम, काय सुंदर दिसता ओ तुम्ही' असे म्हणत बॉसची तारीफ करताना अशोक सराफ यांचा संवाद आणि अश्विनी यांनी त्या चित्रटात नेसलेली लिंबू कलरची साडी आजही विसरलेली नाही.