प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गोड जोडपे आहे. या जोडीला स्क्रीनवर पाहायला त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची जादू आपण यापूर्वी वेबसिरीज आणि सिनेमातून पाहिली आहे. आता पुन्हा एकदा हे दोघे चाहत्यांच्या भेटीला येत आहेत, बिन लग्नाची गोष्ट या सिनेमातून. गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित, तसेच तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बिन लग्नाची गोष्ट’ या सिनेमाचा टीजर नुकताच समोर आला आहे. यामध्ये हे दोघेही एका वेगळ्या नोटमध्ये दिसणार आहेत. या सिनेमाच्या हटके पोस्टर्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. काल प्रियाने 'आमची पहिली गोड बातमी उद्या येते आहे' असे कॅप्शन देत टीजरची उत्सुकता वाढवली होती. (Latest Entertainment News)
या सिनेमाच्या टीजरमध्ये प्रिया गरोदर दिसते आहे. विशेष म्हणजे प्रिया आणि उमेशच्या व्यक्तिरेखा या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या आहेत. आणि या कपलकडे आता गोड बातमी आहे. पण या अवस्थेत आनंदाने एकत्र राहणाऱ्या या जोडीच्या आयुष्यात अशी एक घटना घडते कि त्या दोघानांही अशा कठीण वेळेत सोबत आणखी कुणीतरी असण्याची गरज वाटू लागते. याचवेळी त्यांच्या घरात एन्ट्री होते ती गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या व्यक्तिरेखांची. हे पार्टनर्स लिव्ह इन मध्ये असलेल्या प्रिया उमेशच्या जोडीला नात्याचे नवीन अर्थ शिकवतात कि त्यांच्याकडून शिकतात हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे.
प्रिया आणि उमेश जवळपास १२ वर्षांच्या गॅपने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी हे दोघेही आणि काय हवं या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
अग्गं बाई सासूबाई या मालिकेत दिसलेली धमाल जोडी म्हणजे गिरीश ओक आणि निवेदिता सराफ. ही जोडी आता बिन लग्नाची गोष्ट या सिनेमात दिसणार आहे. अर्थात या सिनेमाच्या टीजरमध्ये त्यांनी आपली ओळख करून देताना 'नो मिस्टर अँड मिसेस जस्ट पार्टनर्स' अशी ओळख करून देताना दिसत आहेत. यांची आतापर्यंतची हटके केमिस्ट्री या सिनेमात दिसेल यात शंका नाही. हा सिनेमा १२ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.