Suraj Chavan Becomes Father Pudhari
मनोरंजन

Suraj Chavan Becomes Father: 'गुलिगत स्टार' सूरज चव्हाण झाला बाबा! जन्माष्टमीला घरात चिमुकल्या परीचं आगमन; VIDEO तुफान व्हायरल

Suraj Chavan Becomes Father: ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला असून त्याच्या घरी चिमुकल्या लेकीचं आगमन झालं आहे.

पुढारी वृत्तसेवा

Suraj Chavan Becomes Father: ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता आणि ‘झापूक झुपूक’ या नावाने घराघरात पोहोचलेला सूरज चव्हाण आता बाबा झाला आहे. सूरज आणि त्याची पत्नी संजना यांच्या आयुष्यात एका गोंडस लेकीचं आगमन झालं आहे. जन्माष्टमीच्या खास दिवशी त्यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाल्याने चव्हाण कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. लेकीच्या जन्माची बातमी समोर येताच सूरजच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

सूरज चव्हाण आणि संजना यांचा विवाह डिसेंबर २०२५ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने संजनाच्या ‘चोर ओटी’चा व्हिडीओ शेअर केल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आलं होतं. त्यानंतर सूरज आणि संजनाने स्वतः चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर करत लवकरच त्यांच्या आयुष्यात चिमुकला पाहुणा येणार असल्याचं सांगितलं होतं.

गर्भावस्थेदरम्यान संजनाचे बेबी बंपसोबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी तिचं डोहाळे जेवणही मोठ्या उत्साहात पार पडलं. या कार्यक्रमाच्या आयोजनात जान्हवी किल्लेकरने विशेष पुढाकार घेतला होता. कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा थाटात पार पडला होता.

रुग्णालयातील सूरजचा VIDEO व्हायरल

लेकीच्या जन्मानंतर सूरज चव्हाणचा रुग्णालयातील पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. सूरजच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या लेकीला आणि पत्नीला भेटण्यासाठी सूरज रुग्णालयात पोहोचल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं.

सूरजला पाहण्यासाठी आणि नवजात बाळाची झलक पाहण्यासाठी रुग्णालयातील स्टाफसह चाहत्यांचीही गर्दी झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतं. या गर्दीतून वाट काढत सूरज संजनाजवळ पोहोचतो. पत्नीला भेटल्यानंतर तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवताना दिसतो. याच वेळी चिमुकल्या लेकीचीही क्षणभर झलक कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

‘गुलिगत स्टार’च्या घरी छोट्या परीचं आगमन

सूरजच्या लेकीच्या आगमनाने त्याच्या कुटुंबात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. जन्माष्टमीच्या दिवशी घरी आलेल्या या चिमुकल्या परीचं कुटुंबीयांनी आनंदाने स्वागत केलं आहे. सूरज आणि संजना यांनी आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं आहे, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.

दरम्यान, सूरज बाबा झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘गुलिगत स्टार’च्या आयुष्यातील हा नवा अध्याय त्याच्या चाहत्यांसाठीही खास ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT