पुढारी ऑनलाईन डेस्क - हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी'मुळे चांगलेच चर्चेत आहेत. या बहुचर्चित कार्यक्रमाच्या होस्टिंगची धुरा रितेश भाऊ सांभाळत आहे. सदस्यांना पाठिशी घातल्याने, त्यांचं कौतुक केल्याने तर कधी त्यांची पाठ थोपटल्याने रितेशचा 'बिग बॉस मराठी'मधला 'भाऊचा धक्का' चर्चेत राहिला! याचे परिणाम टीआरपीतही दिसले आहेत. नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. गेले दोन आठवडे रितेश भाऊ परदेशी चित्रिकरणासाठी गेल्याने त्याला 'भाऊचा धक्का' करता आला नाही. पण आता मात्र भाऊ इज बॅक! रितेश भाऊच्या शेवटच्या 'भाऊच्या धक्क्या'ची प्रतीक्षा आहे.
'भाऊच्या धक्क्या'वर गेले दोन आठवडे रितेश भाऊची कमतरता जाणवली. त्याची सदस्यांची शाळा घेण्याची हटके शैली आणि कल्ला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'बिग बॉस मराठी'च्या घरातलं चावीचं माकड, घरातलं डोअरमॅट अशा अनेक उपमा त्यांनी सदस्यांना दिल्या. सोशल मीडियावर याचे मीम्सदेखील व्हायरल झाले. एका 'भाऊच्या धक्क्या'नंतर दुसऱ्या 'भाऊच्या धक्क्या'ला काय होणार? रितेश भाऊ काय धमाका करणार याची प्रतीक्षा असायची. आता 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला धुमाकूळ घालण्यासाठी रितेश भाऊ सज्ज आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा मंच सुपरस्टार रितेश देशमुख यांनी दणाणून सोडला आहे. रितेश भाऊने आपल्या खास स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. भाऊच्या धक्क्यावर सदस्यांचा योग्य पद्धतीने हिशोब घेण्यात रितेश भाऊ यशस्वी झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'चा यंदाचा सीझन खूपच वेगळा असून इतर सीझनपेक्षा अनेक हटके गोष्टी यंदा पाहायला मिळत आहेत. ग्रँड फिनालेदेखील असाच दमदार सरप्राईजने भरलेला असेल. या ग्रँड फिनालेला रितेश भाऊ काय धमाका करणार याची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे.