मनोरंजन

Jay Dudhane Arrest : ‘बिग बॉस मराठी-३’ फेम जय दुधाणेला अटक; ५ कोटींच्या फसवणुकीचा गंभीर आरोप

'हनीमून'साठी परदेशात जात असताना मुंबई विमानतळावरच बेड्या

रणजित गायकवाड

ठाणे: 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वामुळे प्रकाशझोतात आलेला प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता जय दुधाणे याला ५ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ठाणे पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच दुकान गाळ्याची अनेक ग्राहकांना विक्री करून फसवणूक केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

विमानतळावरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, जय दुधाणे आपल्या कुटुंबासह परदेशात जाण्याच्या तयारीत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. जयसोबत त्याची पत्नी, भाऊ आणि भावजय देखील होते. ठाणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या कुटुंबाचीही प्राथमिक चौकशी केली जात आहे. एकच व्यावसायिक गाळा बनावट दस्तऐवजांच्या साहाय्याने अनेकांना विकून खरेदीदारांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

‘मी पळून जात नव्हतो’; जय दुधाणेचा दावा

अटकेनंतर जय दुधाणेने आपली बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘हा गुन्हा पूर्णपणे खोटा असून मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,’ असे त्याने म्हटले आहे. परदेशात जाण्याबाबत स्पष्टीकरण देताना जय म्हणाला की, तो 'हनीमून'साठी बाहेर जात होता आणि आपल्या नावावर अटक वॉरंट जारी झाल्याची त्याला कल्पना नव्हती. ‘मी पळून जात नव्हतो, उलट तपासात पूर्ण सहकार्य करेन,’ अशी भूमिका त्याने घेतली आहे.

ते वृत्त फक्त अफवा...

या प्रकरणावर मौन सोडताना जयने सांगितले की, गाळा विक्रीबाबतच्या बातम्या अफवा असून आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हानही त्याने दिले आहे.

कोण आहे जय दुधाणे?

ठाणे येथील रहिवासी असलेला जय दुधाणे हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर, खेळाडू आणि अभिनेता आहे. 'बिग बॉस मराठी ३' च्या घरात त्याने आपल्या आक्रमक खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. नुकतेच त्याने त्याची मैत्रीण हर्षाला पाटील हिच्याशी विवाह केला आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या फसवणुकीचे धागेदोरे कुठेपर्यंत पोहोचले आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT