पुढारी ऑनलाईन डेस्क : 'भाभीजी घर पर हैं' या गाजलेल्या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे हि;s एक्स पती पीयूष पूरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी काही काळ लीवर सिरोसिसशी झुंज दिल्यानंतर शनिवार, १९ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. एका इंग्रजी वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ते गेले काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने कुटुंबीयांसह शुभांगी अत्रेने देखील दु:ख व्यक्त केलं आहे.
शुभांगीने माध्यमांसमोर भावना व्यक्त केल्या. तिने सांगितले, "या काळात तुमची सहानुभूती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कृपया मला यावर बोलण्यासाठी थोडा वेळ द्या."
शुभांगी अत्रे आणि पीयूष पूरे यांचे २००३ साली इंदूरमध्ये लग्न झाले होते. पीयूष एक डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल होते. त्यांना २००५ साली एक मुलगी झाली. तिचे नाव आशी आहे. मात्र वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे हे दोघं वेगळे झाले आणि ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिकृतपणे घटस्फोट घेतला होता.
एका सूत्रानुसार, शुभांगी आणि पीयूष यांचं गेल्या काही काळापासून एकमेकांशी कोणताही संपर्क नव्हता. तरीही, पीयूष यांच्या निधनानंतर शुभांगींने दुःख व्यक्त केलं आहे. त्यानंतर तिने रविवारी पुन्हा एकदा भाभीजी घर पर हैं या तिच्या लोकप्रिय मालिकेचे शूटिंग सुरू केले.
या दोघांनी आपल्या वैवाहिक नात्याला संधी देण्याचा प्रयत्न केला होता. पण ते यशस्वी ठरले नाही. मुलीच्या हितासाठी त्यांनी काही काळ घटस्फोट पुढे ढकलला होता. एकत्र राहणं शक्य नसलं तरी ते दोघं आपल्या मुलीच्या भल्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहिले होते. सध्या त्यांची मुलगी आशी अमेरिकेत शिक्षण घेत आहे.