Awarapan 2 Box Office Collection Day 5: सोमवारी बॉक्स ऑफिसवरील कमाईत थोडी घसरण झाल्यानंतर मंगळवारी चित्रपटांच्या कमाईत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले. सध्या थिएटरमध्ये अनेक नवीन आणि काही जुन्या चित्रपटांची स्पर्धा सुरू आहे. मात्र, या स्पर्धेत इमरान हाश्मीच्या ‘आवारापन 2’ने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत भारतात 100 कोटी रुपयांचा नेट कलेक्शनचा टप्पा पार केला आहे.
दुसरीकडे, साऊथ सुपरस्टार सूर्या याचा ‘विश्वनाथ अँड सन्स’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानेही काही दिवसांत मोठी कमाई केली असून ‘आवारापन 2’ला जोरदार टक्कर दिली आहे. तर सनी देओलचा ‘बंटवारा 1947’, ‘डीसी’, ‘स्पायडर मॅन ब्रँड न्यू डे’ आणि थलपती विजयचा ‘जना नायकन’ हे चित्रपटही सध्या बॉक्स ऑफिसवर आपापल्या परीने कमाई करत आहेत.
इमरान हाश्मी स्टारर ‘आवारापन 2’ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चांगली कमाई केली. सोमवारी कमाईत थोडी घसरण झाल्यानंतर मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ झाली.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आवारापन 2’ने मंगळवारी सुमारे 9.75 कोटी रुपयांची नेट कमाई केली. देशभरात हा चित्रपट तब्बल 11 हजारांहून अधिक शोमध्ये दाखवण्यात आला.
या कमाईमुळे भारतातील 5 दिवसांचे चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 100.75 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारतातील एकूण ग्रॉस कमाई 120.33 कोटी रुपये झाली आहे.
परदेशातील प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचव्या दिवशी परदेशात चित्रपटाने सुमारे 2 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे त्याची एकूण ओव्हरसीज ग्रॉस कमाई 23.80 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
जगभरातील एकूण कमाईचा विचार केला तर ‘आवारापन 2’ने आतापर्यंत 144.13 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा दबदबा कायम असल्याचे दिसत आहे.
सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आहे. मात्र, ‘आवारापन 2’च्या तुलनेत त्याची कमाई कमी आहे. तरीही मंगळवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडी वाढ झाली.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, रिलीजच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटी रुपयांची नेट कमाई केली. हा चित्रपट मंगळवारी सुमारे 6 हजार 608 शोमध्ये दाखवण्यात आला.
भारतामध्ये 5 दिवसांत ‘बंटवारा 1947’ने एकूण 30.75 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. त्याची ग्रॉस कमाई 36.54 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
परदेशातही चित्रपटाने पाचव्या दिवशी सुमारे 50 लाख रुपये कमावले. त्यामुळे त्याची एकूण ओव्हरसीज ग्रॉस कमाई 6.75 कोटी रुपये झाली आहे. जगभरातील एकूण कमाई आता 43.29 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.