मनोरंजन

डेव्हिड वॉर्नरची तेलुगू चित्रपटातून सिल्व्हर स्क्रीनवर एंट्री! ‘रॉबिनहूड’ चित्रपटात झळकणार

David Warner : 28 मार्चला चित्रपट होणार रिलीज

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) माहिती आहे ना? एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणा-या या फलंदाजाने भारतातील आयपीलमध्येही धावांचा पाऊस पाडला. 2016 मध्ये त्याने सनरायझर्स हैदराबादला आयपीएल चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आता तो भारतीय चित्रपटसृष्टीत प्रदार्पण सज्ज झाला आहे. ‘रॉबिनहूड’ या तेलगू चित्रपटातून लवकरच तो सिल्वर स्क्रिनवर झळकणार आहे. (australia cricketer david warner telugu film)

वॉर्नरने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स संघांचे नेतृव केले आहे. भारतीय भूमीवर आयपीएलमध्ये फटकेबाजी करताना त्याचे तेलुगू चित्रपटांवर प्रेम जडले. सामने खेळता खेळता त्याने दाक्षिणात्य हिरोंची स्टाईल आत्मसात केली. तो नावाजलेल्या अभिनेत्यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगवर रील्स बनवू लागला. हे रिल्स व्हायरल झाले. भारतीय चाहत्यांना भावले. यातून वॉर्नरचा फॅन फॉलोअर तयार झाला.

नितिनच्या रॉबिनहूड चित्रपटात वॉर्नर!

टॉलिवूड अभिनेता नितिनच्या रॉबिनहूड (Robinhood) चित्रपटात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू वॉर्नर अभिनय करत असल्याची माहिती समोर आली आहे. निर्माता वाय. रवीशंकर यांनी ही बातमी उघड केली. सोमवारी (3 मार्च) हैदराबादमध्ये आयोजित किंग्स्टन चित्रपटाच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत खुलासा केला.

क्रिकेटपटू ते अभिनेता : वॉर्नरचा खास कॅमिओ

रॉबिनहूड हा अभिनेता नितिन आणि दिग्दर्शक वेंकी कुदुमुलु यांच्या यशस्वी जोडीचा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्यांनी भिष्म या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केले आहे. कार्यक्रमादरम्यान, एका सूत्रसंचालकाने निर्मात्यांना चित्रपटाविषयी काही खास माहिती शेअर करण्याची विनंती केली. यावर उत्तर देताना रवीशंकर यांनी डेव्हिड वॉर्नर रॉबिनहूड चित्रपटात एक छोटी भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी हे सांगताना दिग्दर्शक वेंकी कुदुमुलु यांची परवानगी न घेतल्याबद्दल हसत हसत माफीही मागितली.

वॉर्नरच्या भूमिकेची उत्सुकता

रॉबिनहूड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. वॉर्नरच्या शूटिंगदरम्यानच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला, ज्यात तो हातात पिस्तूल धरून उभा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चित्रपटाला जी. व्ही. प्रकाश कुमार यांनी संगीत दिले आहे.

वॉर्नर आणि त्याचे तेलुगू चित्रपटप्रेम

डेव्हिड वॉर्नर हा क्रिकेटपटू असला तरीही त्याला अभिनयाची मोठी आवड आहे, हे त्याने पूर्वी केलेल्या रील्समधून स्पष्ट झाले आहे. विशेषतः पुष्पा चित्रपटाच्या वेळेस, सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग असताना, त्याने त्या चित्रपटातील डायलॉग्स आणि स्टेप्सची नक्कल करून चाहत्यांना भारावून टाकले होते. त्यानंतरही तो अनेक तेलुगू अभिनेत्यांचे अनुकरण करत रील्स बनवत असे. आता मात्र तो थेट तेलुगू चित्रपटात झळकणार असल्याने त्याच्या अभिनयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रॉबिनहूड विरुद्ध हरी हर वीरा मल्लू... बॉक्स ऑफिसवर टक्कर!

रॉबिनहूड हा चित्रपट 28 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, त्याच दिवशी पवन कल्याणचा हरी हर वीरा मल्लू हा चित्रपटदेखील रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. रॉबिनहूड चित्रपटात नितिनसोबत अभिनेत्री श्रीलीला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक अॅक्शन-कॉमेडी एंटरटेनर आहे, अशी माहिती याआधी प्रदर्शित झालेल्या टिझरमधून मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT