दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘रामायण पार्ट 1’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि ‘केजीएफ’ स्टार यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नव्या नावाची भर पडली आहे. लक्ष्मणाची पत्नी ‘उर्मिला’ या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी आसामची उदयोन्मुख अभिनेत्री सुरभी दास हिची निवड करण्यात आली आहे.
या चित्रपटात लक्ष्मणाची भूमिका प्रसिद्ध टीव्ही अभिनेता रवी दुबे साकारणार असून, त्याच्या पत्नीच्या भूमिकेत सुरभी दिसणार आहे. रामायणाच्या महाकाव्यात सीतेप्रमाणेच उर्मिलेच्या त्यागालाही मोठे महत्त्व आहे. 14 वर्षांच्या वनवासात पती लक्ष्मणासोबत न जाता राजवाड्यात राहून तिने केलेला त्याग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे सुरभीची ही भूमिका चित्रपटात अत्यंत खास आणि भावनिक असणार आहे. ती चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये दिसणार आहे.
सुरभी दास ही मूळची आसामच्या गुवाहाटीची असून, तिने ‘निमा डेंझोंगपा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेला उत्तम रेटिंग मिळाले होते. याशिवाय तिने ‘दादा तुमी दस्तो बोर’ (2022) या बंगाली चित्रपटातही काम केले आहे. आता थेट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटात इतकी महत्त्वाची भूमिका मिळणे, हे तिच्या कारकिर्दीतील एक मोठे यश मानले जात आहे. ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर ‘प्रभू राम’, साई पल्लवी ‘सीता’, यश ‘रावण’ आणि सनी देओल ‘हनुमान’च्या भूमिकेत दिसणार आहेत. या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत सुरभी दासच्या निवडीमुळे चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये एका नव्या आणि प्रतिभावान चेहर्याचा समावेश झाला आहे.
'रामायण'चा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होईल. मागील काही दिवसांत निर्मात्यांकडून चित्रपटाचा फर्स्ट लूक टीजर जारी करण्यात आला. ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर तर रावणाच्या भूमिकेत साऊथ सुपरस्टार यश दिसत होता. सोबतच निर्मात्यांनी लक्ष्मण आणि माता सीतेच्या भूमिकेत कोण असणार हे देखील सांगितलं. चित्रपटात साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत असेल तर लक्ष्मण यांच्या भूमिकेत रवि दुबे असेल.