पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘राजकमल एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन हाऊसने नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. दिग्गज अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गाला नक्कीच हा चित्रपट एक मेजवानी ठरणार आहे. थोडी खट्याळ, थोडी गोंडस आणि थोडी हळवी अशी ही अनोखी गोष्ट आपल्या समोर सादर करायला राहुल शांताराम हे सज्ज आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश गुप्ते हे करत आहेत.
अभिनेते अशोक सराफ म्हणाले, "बऱ्याच काळानंतर मला इतकी सशक्त भूमिका साकारण्यासाठी मिळालीय, मी त्याची वाट बघत होतो. चित्रपटाची गोष्ट सध्याच्या काळाशी सुसंगत आहे. दिग्दर्शक लोकेश गुप्तेने चित्रपटाचा विषय निवडून अगदी सुरेख काम केलंय. शूटिंग दरम्यान, त्याचा सिनेमा या माध्यमाचा अभ्यास आणि त्यावरील पकड मला दिसली. वंदना गुप्ते या हरहुन्नरी अभिनेत्रीसोबत मी यापूर्वीही काम केलंय. ती व्यक्ती आणि अभिनेत्री या दोन्ही स्वरूपात कमालीची उत्कट आणि हजरजबाबी आहे. तिचं आणि माझं गिव्ह-अँड-टेकचं टायमिंग छान आहे, त्यामुळे या दोन्ही पात्रांना उठावदारपणा आलाय. आम्ही दोघांनीही नेहमीसारखं प्रामाणिकपणे, जीव ओतून आपापलं पात्र साकारलंय. तिच्यासोबत काम करताना नेहमीच मजा येते. विशेष म्हणजे, निर्माता राहुल शांताराम ह्याला मी लहानाचा मोठा होताना बघितलेलं आहे. त्याचे वडील आणि माझा मित्र किरण शांताराम याला माझी बायको निवेदिता गेली ३३ वर्ष राखी बांधत आलेली आहे, त्यामुळे राहुल हा माझा भाचाच आहे. आता स्वतंत्र निर्मिती करत असताना त्याची सिनेमाबद्दलची जबाबदारी, संपूर्ण युनीटसाठी असलेली तळमळ आणि कामाचा उत्साह बघून त्याचं मला मनापासून कौतुक वाटतं. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांची उत्तम भट्टी जमून आलेली आहे. त्यामुळे आमच्याइतकी मज्जा प्रेक्षकांनासुद्धा चित्रपट बघताना येईल, असा विश्वास वाटतो."
चित्रपटाविषयी बोलताना राहुल शांताराम यांनी सांगितलं, "मातीतल्या, स्थानिक गोष्टी जगभरात पोहोचवण्याचा आमचा कयास आहे. आमचे मोठे पप्पा अर्थात् चित्रपती व्ही. शांताराम यांच्याप्रमाणेच सिनेमामधल्या कलावंत आणि तंत्रज्ञांच्या टॅलेंटला हक्काचा प्लॅटफॉर्म देण्याच्या हेतूनं आम्ही काम करतो. म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेची नवी सुरूवात एका खास मराठी चित्रपटासोबत करतोय. लोकेश जेव्हा आमच्याकडे गोष्ट घेऊन आला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपसूकच अशोक मामा आणि वंदनाताई आले. या दोघांसोबत काही इतर अनुभवी कलाकार आणि अत्यंत नवीन आणि फ्रेश टॅलेंटसुद्धा आपल्याला बघायला मिळतील."
वंदना गुप्ते म्हणाल्या, "अशोक सराफसारखे एक उत्तम अभिनेते चित्रपटात आहेत. अशोक सराफ हा अत्यंत कसलेला अभिनेता आहे. कॅमेऱ्याचा प्रत्येक अँगल, दिग्दर्शकाने लावलेली फ्रेम, या प्रत्येक पैलूचा त्याचा बारीक अभ्यास आहे. त्यानुसार आपल्या अभिनयाची शैली बदलत राहणं आणि मुख्य म्हणजे, आपल्या सोबतच्या प्रत्येक कलाकाराला पूर्णपणे कम्फर्टेबल करणं, यांत त्याचा हातखंडा आहे. त्यासाठी हॅट्स ऑफ टू हिम. त्याच्यासोबत मी अनेकदा काम केलं आहे आणि दरवेळी खूप समाधान मिळालेलं आहे. खूप वर्षांनी पुन्हा त्याच्यासोबत अभिनय करायची संधी मिळाली आणि मी ती सोडली नाही. लोकेश गुप्ते यांनी अतिशय छान स्क्रिप्ट लिहिलीय आणि दिग्दर्शनही उत्तम केलंय. ह्या सुवर्णसंधीबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि पडद्यावरून प्रेक्षकांना भेटायला जाण्याची आतुरतेने वाट पाहतेय."
दिग्दर्शक लोकेश गुप्ते म्हणाले, "या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या मराठीतील दोन दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. दोघांनीही नाटक, चित्रपट, मालिका ही सर्व माध्यमं अक्षरशः गाजवून सोडलीत. वंदना गुप्तेंसोबत वेगळं नातं आहे, माझ्या सुरुवातीच्या काळात त्यांच्याबरोबर मी नाटक केलं. पण आता या चित्रपटाच्या निमित्ताने मी एक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. अशोक सराफ सरांसोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. कलाकार म्हणून त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे, ही दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी होती. या सगळ्यासाठी मी धन्यवाद देतो निर्माते राहुल शांताराम यांना, त्यांच्या प्रयत्नामुळे हा चित्रपट जुळून आला. हा अनुभव आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील."
हा नवा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या भेटीला येणार आहे.