Sachin Tendulkar at Asha Bhosle Funeral pudhari
मनोरंजन

Sachin Tendulkar at Asha Bhosle Funeral: स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप: सचिन तेंडुलकरचे डोळे पाणावले

Anirudha Sankpal

Sachin Tendulkar at Asha Bhosle Funeral: भारतीय संगीत क्षेत्रातील एक देदीप्यमान तारा, स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी 'मल्टी ऑर्गन फेल्युअर'मुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ सिनेसृष्टीच नव्हे, तर अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. आशाताईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असता, क्रीडा आणि सांस्कृतिक विश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांचे दर्शन घेतले. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने देखील आशाताईंचे अंत्यदर्शन घेतलं. त्यावेळी त्याचे डोळे पाणावले होते.

सचिन तेंडुलकरच्या डोळ्यांत अश्रू; कुटुंबीयांचे केले सांत्वन

आशाताईंच्या निधनाची बातमी समजताच क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आपल्या परिवारासह त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. आशाताईंशी सचिनचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अंत्यदर्शनावेळी आशाताईंचा तो शांत चेहरा पाहून सचिनला आपले अश्रू अनावर झाले. ज्या आवाजाने अनेक दशके भारतीयांच्या मनावर राज्य केले, तो आवाज कायमचा शांत झाल्याचे पाहून सचिनचे डोळे पाणावले होते. त्याने भोसले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी सचिनसह उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आशाताईंच्या आठवणींनी पाणी आले होते.

केतकी माटेगावकर यांनी जागवल्या 'गोड' आठवणी

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने 'पुढारी न्यूज'शी बोलताना आशाताईंबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. "आशाताई आणि लतादीदी म्हणजे साक्षात देवरूप होते. मी १३-१४ वर्षांची असताना माझ्या कॉन्सर्टला आशाताई आल्या होत्या, तेव्हा मी खूप घाबरले होते. मात्र, त्यांनी अत्यंत गोड हास्याने मला प्रोत्साहन दिले आणि 'छान गातेस बाळ, रियाज सुरू ठेव' असा आशीर्वाद दिला," अशा शब्दांत केतकीने आठवणींना उजाळा दिला.

केतकी पुढे म्हणाली की, "आशाताईंची १२ हजार गाणी म्हणजे आमच्यासारख्या तरुण गायकांसाठी एक मोठा अभ्यासक्रम आहे. वयाच्या ९२ व्या वर्षीही त्या पहाटे उठून रियाज करायच्या, हेच त्यांच्या यशाचे गमक होते. त्या नेहमी सांगायच्या की गाणे गाण्यापेक्षा ते शंभर वेळा ऐकणे जास्त महत्त्वाचे आहे." केतकीने यावेळी आशाताईंचे अत्यंत प्रिय 'दो लफ्जों की है दिल की कहानी' आणि 'मी मज हरपून बसले ग' ही गाणी गुणगुणून त्यांना स्वरांजली वाहिली.

एका युगाचा अंत

वयाच्या ९० व्या वर्षीही स्टेजवर तीन-तीन तास उभं राहून गाण्याची ऊर्जा असणाऱ्या आशाताई आज आपल्यात नाहीत, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. शास्त्रीय संगीतापासून ते कॅबरे आणि पॉप संगीतापर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या आशाताईंनी आपल्या गाण्यांचा जो वारसा मागे ठेवला आहे, तोच आता पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT