मुंबई : भारतीय पार्श्वगायनाच्या सुवर्णयुगाचा अंत करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतच नव्हे, तर जागतिक संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने आशाताईंना अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आपल्यासाठी सदैव अविस्मरणीय राहतील, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
ब्रेट ली आणि आशा भोसले यांनी २००७ मध्ये 'यु आर द वन फॉर मी' या गाण्यासाठी एकत्र काम केले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमामुळे एका जागतिक क्रीडा ताऱ्याचा आणि भारतीय संगीत क्षेत्रातील महान गायिकेचा दुर्मिळ संगम पाहायला मिळाला होता. या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ब्रेट लीने इन्स्टाग्रामवर लिहिले की, "आशा भोसले यांच्यासारख्या असामान्य प्रतिभेच्या धनी असलेल्या व्यक्तीसोबत गाणे लिहिणे आणि ध्वनिमुद्रित करणे, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्यांनी आयुष्यात जे काही मिळवले, त्यानंतरही त्यांचा नम्र स्वभाव आणि प्रेमळ वागणूक मनाला स्पर्शून गेली."
सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या भेटीची आठवण सांगताना ली म्हणाला की, आशाताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही, मात्र त्यांचे संगीत पिढ्यानपिढ्या जिवंत राहील,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला.
आशा भोसले यांच्या निधनामुळे रविवारी वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या सामन्यापूर्वी शोक व्यक्त करण्यात आला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दंडावर काळी फिती बांधून मैदानात प्रवेश केला, तसेच सामन्याच्या सुरुवातीला एक मिनिट मौन पाळून त्यांना मानवंदना देण्यात आली. क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आशाताईंचे योगदान अतुलनीय असल्याचे म्हटले. सोमवारी दुपारी मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबासह अंतिम दर्शनासाठी उपस्थित होता.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत आशा भोसले यांचे नाव आदराने घेतले जाते. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून, २०११ मध्ये 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'ने जगातील सर्वाधिक गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका म्हणून त्यांची नोंद केली होती. भारत सरकारने त्यांना 'पद्मविभूषण' (२००८) आणि 'दादासाहेब फाळके' (२०००) या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक गायनातून निवृत्ती घेतली होती, तरीही त्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये मार्गदर्शक म्हणून सहभागी होत असत. त्यांच्या निधनाने संगीत विश्वातील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.