आशा भोसले की लता मंगेशकर, श्रेष्ठ कोण, हे दोन पक्ष या देशात अमर आहेत. ते कधीही बरखास्त होणार नाहीत. ते कधीही विलीन होणार नाहीत. उलट आकाशात सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत आशा की लता, हा झगडा कायम राहील. त्यावर खुद्द आशाताईंनी 2012 मध्ये मांडलेली भूमिका, त्यांच्याच शब्दांत...
आशा भोसले की लता मंगेशकर, श्रेष्ठ कोण, हे दोन पक्ष या देशात अमर आहेत. ते कधीही बरखास्त होणार नाहीत. ते कधीही विलीन होणार नाहीत. उलट आकाशात सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत आशा की लता, हा झगडा कायम राहील. त्यावर खुद्द आशाताईंनी 2012 मध्ये मांडलेली भूमिका, त्यांच्याच शब्दांत...
मला सांगा, मी आधीची मंगेशकर नसते, तर ही भांडणं झाली असती का? मी जर पंजाबी असते किंवा गुजराती असते, कुणीही असते; पण महाराष्ट्रीयन नसते. लताची बहीण नसते, तर हा प्रश्न आलाच नसता. आज नूरजहाँ आणि लताची तुलना होते; पण भांडणं होत नाहीत. मग, माझ्याबाबतीतच भांडणं का? नेहमी तराजूत मला टाकलं. लता मोठी की आशा मोठी? तराजू नेहमीच होता, पहिल्यापासून. तो तराजू माझ्याबाबतीच का आला? सगळ्या लोकांच्या बाबतीत नाही आला. गीता दत्तच्या बाबतीत नाही आला. शमशाद बेगमच्याबद्दलही तो नव्हता. माझ्यासाठीच का, याचं उत्तर मला आजही मिळालेलं नाही.
एकदा नूरजहाँ आली होती. ताजमध्ये मुक्काम होता. आम्हाला लहानपणी भेटलेली. दीदीसोबत मीही गेले. दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. नूरजहाँ म्हणाली, ‘लता तुम्हारे गले मे खुदा का नूर है. अल्लाहने तुम्हे क्या नहीं दिया हैं..!’ त्यावर लता म्हणाली, ‘नहीं नहीं आपा, जो आप में हैं वो किसी भी में नहीं है... खुदा खुद आपके गले में आके बैठा है.’ मी एका कोपर्यात बसले होते. डोक्याला हात लावून..! की मी कोण आहे..? तेवढ्यात नूरजहाँची मुलगी आली, हातभर बांगड्या भरलेली. म्हणाली, ‘तुम्हे एक बात बताऊं? वे जो लोग बात कर रहे हैं ना, पुराने जमानो की हैं, हम तो आपके फैन है...’
म्हणजे मोठ्या लोकांमध्ये अजूनही अस्संच ओळखतात की, लता की बहन है... मला आवडतं; पण त्याला जोडून ही चांगली गाते की, ती चांगली गाते, ते नाही आवडत. तिची स्टाईल वेगळी, माझी स्टाईल वेगळी. ती फार सुंदर गाते. प्रश्नच नाही. तिचा आवाज ऐकला की, डोळ्यात पाणी येतं; पण चंद्र चांगला म्हणून सूर्याला कुणी शिव्या घालत नाही. शिव्या का घालता..? तुलना करताना दुसर्याला वाईट का म्हणता..? गोरी बाई चांगली म्हणून कुणी काळ्या बाईला शिव्या घालतं का..? पण, मला हा स्वभावच पटत नाही. एकीला सुंदर आहे म्हणताना आपण दुसरीला नाव ठेवत नाही, तराजूत टाकत नाही. मला मात्र जन्मभर तराजू मिळाला. अर्थात, त्यानं काही फरक पडत नाही, चांगलं-वाईट म्हटल्यानं आयुष्यातही तसा काही फरक पडत नाही. शेवटी माझं गाणंही थांबलं नाहीच. 11 हजार गाणी झाली माझी.
आता बघा ना, नजाकत सलामत गात होते. बडे गुलाम अली-बरकत अली गात होते. कुठंतरी काहीतरी असं असतं. लोकांमध्ये म्हणा की, घरांमध्ये हा चांगला की तो चांगला, आम्ही कधी अशी तुलना केली नाही की, नजाकत चांगला की सलामत? आम्हाला दोन्ही छान वाटायचे. आमच्या दोघींमध्ये मात्र तुलना दाखवली जाते. दोघी बहिणींमध्ये चांगले नाही असंही दाखवलं जातं. मला असं वाटतं की, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक भावा-बहिणीमध्ये काहीतरी वेगळं असतंच. मला पिंक आवडतं, तिला व्हाईट आवडतं. मला केस कापलेले आवडतात, तिला लांब वेण्या आवडतात. हे जे सगळे छोटे छोटे प्रकार असतात, ते सगळ्याच घरांमध्ये असतात; पण माझ्याकडनं मी सांगते, माझ्याकडे जेलसी हा प्रकार नाही; पण पहिल्यापासून असं काहीतरी घडत गेलं, बिघडत गेलं. ‘चंदा ये परदेस’ हे गाणं.. मी रिहर्सल केली होती. चार-पाच वेळा. नवीन होते मी. एकदम रेकॉर्डिंगला बोलावलं. त्यावेळी असं असायचं की, रेकॉर्डिंगच्या बाहेर बूथ व्हॅन असायची. त्या व्हॅनमध्ये मशिन असायचं. स्टुडिओमध्ये गात असणार्या लोकांचा आवाज बाहेर रेकॉर्ड व्हायचा. मी आवारातच बसलेले अन् दीदी गात होती आतमध्ये. गाणं ऐकल मी. माझं गाणं कोण गातंय, हा पहिला प्रश्न पडला. तिचा आवाज इतका तरल आणि सुंदर होता की, जसा ड्राऊट फिश मोठ्या धबधब्यातून देखील वर चढतो, तशी तिची तान वर जायची आणि धबधब्यासारखी खाली यायची. इतका सुंदर आवाज फक्त माझ्या बहिणीचाच असू शकतो. तिनं का गायलं माझं गाणं? दुसरा प्रश्न स्वतःलाच विचारला मी. की आशा, तुझ्यातच काही कमी असेल... म्हणजे आशा तुझ्यातच दोष आहे. तिच्यावर किंवा कुणावरही जळण्यात तुला काही मिळणार नाही... स्वतःला त्या पातळीला नेण्याचा प्रयत्न करणं हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे सगळ्या परिस्थितीशी लढत, झगडत मी या पातळीला आले. ‘अब के बरस भेज भय्या को बाबुल...’ हे ऐकलं तर कुणी म्हणणार नाही की, मी कॅब्रे गाते किंवा ‘मेरा कुछ सामान’ हे गुलजारचं गाणं घ्या, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’, ‘शोक नजर की बिजलिया’, ‘झुमका गिरा रे...’ मी माझ्या गाण्याला, आवाजाला प्रॅक्टिस ठेवली. स्वत्वाला वर नेत गेले. स्वतःची बुद्धी होती. देवाचा आशीर्वाद होता.
पिक्चर चालो न चालो, काम मिळत गेलं आणि माझी इच्छाही तीच होती. काम चालू राहिलं पाहिजे. गाडी बंद पडली, तर घर बंद पडेल. माझ्याशिवाय कुणी नव्हतं घराला. एक खांबाचा तंबू. त्यात माझी तीन पोरं. त्यांना सांभाळण्यासाठी काम करणं आवश्यक होते. पुढे मी पंचमशी लग्न केलं, तरी मुलं सोबत होती माझ्या. त्यांच्यासाठी मिळतील ती गाणी मी गायिली. मग, स्टंटची किंवा धार्मिक पिक्चरची असतील. मला वाटतं सर्वाधिक गाणी मी त्रिपाठीजींची गायिली. ‘हे भगवान भगवान भगवान... आजाव आजाव आजाव...’ पाचव्या मजल्यापर्यंत ओरडून त्याला बोलवायचं! कुठल्याही पिक्चरमध्ये तुम्हाला माझे गाणं मिळेलच. एक असो, दोन असो, गात गेले. म्हणून माझी गाणी इतकी झाली. रात्रंदिवस गायची मी. सकाळी बाहेर पडले की, रात्री दोन-तीनला घरी जायचे. रोज चार-पाच गाणी गायचे. कारण, ताकाला जायचे आणि भांडं लपवायचे असे नाही. कामाला जातो तर मिळेल ते काम केलं पाहिजे. त्यात चॉईस नाही ठेवायचा. मी फक्त हिरोईनची गाणी गाईन म्हटलं, तर मग घरी बसा! दीदी तेव्हा नावारूपाला आलेली. शिवाय गीता दत्त होती, शमशाद होती, जोहरा होती, शर्मा नावाची आणखी कोणीतरी बाई होती. किशोरी आमोणकर होती. त्या वेळी त्याही गायिलेल्या आहेत. कामे कशी मिळणार? उगाच खोटा मान ठेवून, इगो ठेवून मी नाही जगले. फार चागलं झालं की, मी पाय जमिनीवर ठेवूनच चालले. मी हवेत गेले असते, तर उडून गेले असते. काम मिळालं नसतं आणि पैसाही मिळाला नसता.