मुक्ता बर्वे-सई ताम्हणकरच्या 'असंभव' चित्रपटाची घोषणा instagram
मनोरंजन

Asambhav Movie | मुक्ता बर्वे-सई ताम्हणकरच्या 'असंभव' चित्रपटाची घोषणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर आणि सतीश राजवाडे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘असंभव’ या आगामी चित्रपटाची घोषणा आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर झाली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘असंभव’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता, दिग्दर्शक सचित पाटील आणि निर्माते नितीन प्रकाश वैद्य पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीसाठी एकत्र आले आहेत. ‘क्षणभर विश्रांती’ आणि ‘साडे माडे तीन’ या यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर सचित पाटील निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहेत. तर वळू ‘नाळ’, ‘गच्ची’, ‘मन फकिरा’, ‘एकदा काय झालं, ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ ते आगामी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठीशी असलेल्या नितीन प्रकाश वैद्य यांची भक्कम साथ त्यांना चित्रपट निर्मितीत लाभणार आहे.

दिग्दर्शक, अभिनेते पुष्कर श्रोत्री ‘असंभव’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सचित पाटील ‘असंभव’ या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या निर्मितीबरोबरच त्यात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ‘दुनियादारी’ ते ‘मिमी’ अशा मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी वाटचालीबरोबरच ओटीटी या नवमाध्यमावरही ‘भक्षक’, ‘मानवत मर्डर्स’सारख्या कलाकृतीतून नावाजलेली अभिनेत्री सई ताम्हणकर या दोन सशक्त अभिनेत्रीही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक सतीश राजवाडे या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत. इतक्या ताकदवर कलाकारांना एकत्र आणणारा ‘असंभव’ हा चित्रपट रहस्यपट आहे की थरारपट? ही पूर्णतः नवीन विषयावरची कलाकृतीं आहे की एखाद्या जुन्याच विषयाशी याचे धागेदोरे जुळतायेत? या सगळया प्रश्नांच्या उत्तरांसह या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

आम्हा चौघांपैकी काहींनी एकमेकांबरोबर आधी चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पण चौघंही एकाच चित्रपटात पहिल्यांदाच अभिनयासाठी एकत्र आलो आहोत. शिवाय, पुष्करच्या दिग्दर्शनाखाली आम्ही पहिल्यांदाच काम करतो आहोत. त्यामुळे आशय आणि अभिनयाच्या बाबतीत वेगळेपण असेलला ‘असंभव’ प्रेक्षकांसाठी निश्चितच खास पर्वणी ठरणार आहे.
सचित पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT