प्रेमाची रमणीय कथा 'असा मी...अशी मी...‘ pudhari photo
मनोरंजन

Asa Mi Ashi Mi Marathi movie : प्रेमाची रमणीय कथा 'असा मी...अशी मी...‘

Asa Mi Ashi Mi Marathi movie : पुन्हा नात्यात गुंतण्याचा मोह टाळणाऱ्या एका भावुक तरुणीची आणि तितक्याच मस्तकलंदर प्रौढ पुरुषाची रमणीय कथा

पुढारी वृत्तसेवा

Asa Mi Ashi Mi Marathi movie

अनुपमा गुंडे

आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे अनेकांचा प्रेम, नाती, त्यातील बांधिलकी यावरचा विश्वास उडालेला असतो, त्यामुळे पुन्हा नात्यात गुंतण्याचा मोह टाळणाऱ्या एका भावुक तरुणीची आणि तितक्याच मस्तकलंदर प्रौढ पुरुषाची रमणीय कथा ‌‘असा मी...अशी मी...‌’

युनायटेड किंगडम देशात वास्तव्यास असलेल्या छायाचित्रकार वैभव राजाध्यक्ष (अजिंक्य देव) आणि अनघा देशमुख (तेजश्री प्रधान) यांच्यात हळुवार फुलणारी रमणीय प्रेमकथा आहे. वैभव हा कोल्हापूरचा. आई-वडील वेगळे झालेले, त्यामुळे वैभवचे आयुष्य चेंडूसारखे कधी आईकडे कधी वडिलांकडे. त्या दोघांच्या निधनानंतर काका-काकू त्याचा सांभाळ करतात. छायाचित्रकार काकांचा कॅमेरा हाताळता हाताळता तोही छायाचित्रकार होतो.

लंडनमध्ये वास्तव्यास येतो. एकापेक्षा एक सुंदर मॉडेलची छायाचित्रे काढता काढता आवडलेल्या मॉडेल्ससोबत तो संबंधही ठेवतो, मात्र रात गई बात गई...या पलीकडे तो या संबंधांकडे पाहत नसतो. अशातच एक ट्रॅव्हल्स कंपनी चालविणाऱ्या कंपनीची संचालिका अनघाला तिच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी म़ॉडेल्स हव्या असतात. त्यानिमित्ताने वैभव आणि अनघाच्या भेटीचा सिलसिला सुरू होतो. अनघाचे साधे, निरागस आणि लोभस व्यक्तिमत्त्व मॉडेलिंगसाठी परफेक्ट असल्याचे वैभव सुचवतो आणि अनघा मॉडेलिंगसाठी तयार होते.

फोटोग्राफीदरम्यान दोघे जवळ येतात. वैभव हा आपल्या प्रेमात पडल्याच्या सुखद जाणिवेत अनघा असतानाच दोघे एकमेकांपासून का दुरावतात आणि या गोड प्रेमकथेचा शेवट सुखद कसा होतो, दोन भिन्न रेषेत चालणारी माणसे एकाच दिशेने कशी चालू लागतात, हे चित्रपटातच पाहण्यासारखे आहे.

लग्नात प्रेमच नसल्याने वेगळी झालेली हळवी, पण खंबीर अनघा तेजश्री प्रधान यांनी छान उभी केली आहे. अजिंक्य देव यांचे या वयातही नायक म्हणून दर्शन सुखावणारे आहे. अनघाच्या वडिलांच्या भूमिकेतील संजय मोने, बिझनेस पार्टनर, मैत्रीण यशश्री मसूरकर आणि मित्र माधव देवचक्के या सगळ्यांनी कथानकाला साजेशा भूमिका केल्या आहेत. गाणी शब्दप्रधान आणि आल्हाददायक संगीतामुळे श्रवणीय झाली आहेत. परदेशातील आल्हाददायक वातावरणामुळे ही प्रेमकथा रमणीय अशी झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT