Arjun Rampal engagement
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळची साथीदार गॅब्रिएला डेमेट्रियाड्स यांनी अखेर आपल्या नात्याला अधिकृत नाव दिले आहे. रामपालने नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये गॅब्रिएलासोबत साखरपुडा झाल्याचा खुलासा केला, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टवर लग्नाच्या विषयावर चर्चा सुरू होती. यावेळी अर्जुन रामपालने याबाबत खुलासा केला. या संभाषणात गॅब्रिएला प्रेमाबद्दल आपले मत मांडताना म्हणाली, "प्रेम अटींसह येते. पण जेव्हा तुम्हाला मूल होते, तेव्हा तुम्ही तसे करू शकत नाही." रामपालने सांगितले, "मी तिच्यामागे धावलो कारण ती हॉट होती. पण नंतर जाणवले की यात केवळ हॉटनेस पेक्षा अधिक काहीतरी आहे."
गॅब्रिएलाने "आम्ही आता विवाहित नाही, पण कोण जाणे?" असे म्हणताच, रामपालने लगेच आमचा साखरपुडा झाला आहे, असे सांगून रिया चक्रवर्तीलाही आश्चर्याचा धक्का दिला.
२०१८ पासून अर्जुन आणि गॅब्रिएला एकत्र आहेत. त्यांना अरीक आणि अराव असे दोन मुलगे आहेत. गॅब्रिएला, जी मूळची दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे, ती अनेकदा आपले करिअर आणि मातृत्व यांच्यातील समतोल साधण्याबद्दल बोलताना दिसते.
गॅब्रिएलासोबतच्या नात्यापूर्वी, अर्जुन रामपालने उद्योजिका मेहर जेसिया हिच्याशी लग्न केले होते. १९९८ मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याने २०१८ मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना महिका आणि मायरा नावाच्या दोन मुली आहेत. दोघेही त्यांचे पालनपोषण करतात.