बॉलीवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेस, स्टाईल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. वयाच्या 52व्या वर्षीदेखील ती तरुणींनाही लाजवेल असा आत्मविश्वास आणि लूक जपते. अभिनेता अर्जून कपूर सोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका पुन्हा रिलेशनशिपमध्ये आहे का, असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचे कारण म्हणजे अलीकडेच तिने दिलेले एक वक्तव्य.
एका शोदरम्यान मलायकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल खुलेपणाने भाष्य केले. मलायका आणि अर्जुन कपूर हे जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी कधीच आपले नाते लपवले नव्हते. मात्र, 2024 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या नात्याबाबत बोलताना मलायका म्हणाली, ‘अर्जुन माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग होता. मात्र, माझ्या भूतकाळाबद्दल किंवा भविष्याबद्दल फारसं बोलण्याची माझी इच्छा नाही.
यावर आधीच खूप काही लिहिलं गेलं आहे. माझं वैयक्तिक आयुष्य जणू मीडियासाठी एक ‘फीडिंग ग्राउंड’ बनलं आहे.’ अलीकडे मलायकाला एका व्यक्तीसोबत म्युझिक कॉन्सर्ट आणि एअरपोर्टवर पाहिल्यानंतर तिच्या नव्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. मात्र, या अफवांवर तिने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ती म्हणाली, ‘लोकांना चर्चा करायला आवडतं. तुम्ही कुणासोबत दिसलात की लगेच त्याचा मोठा मुद्दा बनतो. मी अशा निरर्थक अफवांना हवा देऊ इच्छित नाही. खरं सांगायचं तर, मी एखाद्या जुन्या मित्रासोबत, लग्न झालेल्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत किंवा अगदी माझ्या मॅनेजरसोबत दिसले तरी लगेच नावं जोडली जातात. आता तर हे सगळं मला मजेशीर वाटायला लागलं आहे.’