मनोरंजन

Apsara Movie : ‘अप्सरा’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेम, राजकारण, अॅक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी "अप्सरा" या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलाय. अप्सरा हा चित्रपट येत्या १० मे पासून प्रदर्शित होणार आहे.

सुनील भालेराव यांच्या 'श्रमण फिल्म्स' या निर्मिती संस्थेतर्फे 'अप्सरा' चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तिन्हीही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे.

गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांनी स्वरसाज चढवला आहे. अभिनेता सुयश झुंजुरके, अभिनेत्री मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, मयूर पवार, खान्देशरत्न सचिन कुमावत, विजय निकम, राजेश भोसले, आशिष वारंग, समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. राजा फडतरे यांनी छायांकन, निलेश राठोड यांनी संकलन, तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माझिरे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

एका तरुणाच्या मनात असलेलं एका अप्सरेचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर "अप्सरा" हा चित्रपट बेतला आहे. एक अनोखी प्रेमकथा असलेल्या अप्सरा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज बांधता येतो. तरुणाला भेटणारी त्याच्या मनातली अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण, त्या सगळ्याला तो तरूण कसा सामोरा जातो याचं कथानक चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT