तीन मुलांच्या मैत्रीची अनोखी गोष्ट पाहायला मिळणार  Instagram
मनोरंजन

April May 99 Movie |तीन मुलांच्या मैत्रीची गोष्ट ‘एप्रिल मे ९९’ मधून येतेय भेटीला

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. टीझर पाहून या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली असतानाच चित्रपटातील तीन कलाकारांचे चेहरे समोर आले आहेत. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेशच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मात्र यात आणखी एक प्रमुख चेहरा आहे जो अद्यापही पडद्याआड आहे. त्यामुळे याबद्दलची उत्सुकता अजूनही ताणलेलीच आहे. दरम्यान यात चित्रपटात आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) यांच्या भूमिका आहेत.

आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात व मंथन काणेकर या तिघांनी याआधीही काही चित्रपटांत, मालिकांमध्ये काम केले आहे. आर्यन मेंगजी याने ‘मोनिका ओ माय डार्लिंग’, बरोट हाऊस’, ‘डायबुक’, ‘बाबा’, '१५ ऑगस्ट', ‘बालभारती’ अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आर्यनला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘बालभारती’ चित्रपटासाठी उत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. श्रेयस थोरात याने कलर्स मराठीवरील ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत मोरूची भूमिका साकारली आहे. तर मंथन काणेकर याने ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘योगयोगेश्वर जय शंकर’, आणि ‘गाथा नवनाथांची’ या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने ओळख निर्माण केली आहे. आता हे कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश उन्हाळ्याची सुट्टी गाजवायला सज्ज झाले आहेत.

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “ ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी योग्य कलाकार निवडणं आमच्यासाठी आव्हानात्मक होतं. अनेक मुलांच्या ऑडिशन्स घेतल्यानंतर आम्ही आर्यन, श्रेयस आणि मंथन यांची या चित्रपटासाठी निवड केली. आर्यनची माधुरी दीक्षित यांच्या '१५ ऑगस्ट' चित्रपटासाठी मीच निवड केली होती. तर रोहित शेट्टी यांची निर्मिती असणाऱ्या ‘स्कूल कॅालेज आणि लाईफ’ या चित्रपटासाठी श्रेयसची निवड केली होती. त्यामुळे हे दोघे माझ्या परिचयाचे होते. असे असले तरीही आमच्या टीमने ॲाडिशन घेऊन ते या भूमिकेत चपखल बसतात का, याचा विचार करूनच त्यांची निवड केली. सिद्धेशच्या भूमिकेसाठीही आम्ही बरेच पर्याय बघितले होते. परंतु त्याचे आणि त्याच्या वडिलांचे कास्टिंग मॅच करण्यासाठी आम्ही मंथनची निवड केली. हे तिघेही या भूमिकांसाठी अगदी योग्य आहेत. श्रेयस आणि मंथनचा प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट आहे.”

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “रोहन मापुस्कर हे इंडस्ट्रीतील कास्टिंग डिरेक्टर म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटात कोण झळकणार याची उत्सुकता मलाही खूप होती. ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मैत्री, तारुण्याच्या आठवणींना उजाळा देणारा असल्याने चित्रपटातील कलाकारांची योग्य निवड होणे, हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्यानुसार ही निवड झाली आहे. मुलांची निवड झाल्यानंतर त्यांचे तीन महिन्यांचे वर्कशॉप घेण्यात आले. आता लवकरच प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री पडद्यावर पाहायला मिळेल. हा एक कौटुंबिक चित्रपट असून तो सर्वांनी एकत्र पाहावा असा आहे.’’

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सहनिर्माते आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT