मुंबई : पुढारी ऑनलाईन
सिनेअभिनेत्री पायल घोष हिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणप्रकरणी सिनेदिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याकडून वर्सोवा पोलिसांना काही पुरावे सादर करण्यात आले असले तरी अद्याप काही ठोस पुरावे सादर होणे बाकी आहे, तशी कबुलीच त्यांच्यासह त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. या सर्व पुराव्याची शहानिशा केल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे.
दरम्यान आपल्या जबानीत अनुराग याने पायल घोष हिला आपण ओळखत नसल्याचा आरोप करताना कोण पायल अशी विचारणा केली होती असे एका वरिष्ठ अधिकार्याने बोलताना सांगितले. सिनेअभिनेत्री पायल घोष हिने अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करुन वर्सोवा पोलिस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध विनयभंगासह बलात्कार आणि इतर भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास पोलिस निरीक्षक कौस्तुभ मिठबावकर यांच्याकडून सुरू आहे.
अलीकडेच या प्रकरणात अनुराग कश्यपची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती, यावेळी त्यांनी पायलने केलेल्या आरोपाचे खंडन करताना आपण घटनेच्या दिवशी मुंबईत नव्हतो तर श्रीलंका येथे शूटींगसाठी व्यस्त असल्याचे सांगितले होते, याबाबत त्यांनी काही पुरावे सादर केले होते, इतर काही पुरावे लवकरच आपण सादर करू असेही त्यांच्यासह त्यांच्या वकिलांनी पोलिसांना सांगितले होते, मात्र अद्याप ते पुरावे पोलिसांना सादर करण्यात आले नाही. या सर्व पुराव्याची शहानिशा केली जाईल, त्यात किती तथ्य आहे याची तपासणी केली जाईल आणि नंतर त्यांच्यावरील कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे. याच जबानीत अनुरागने पायलला ओळख नसल्याचे सांगून कोण पायल घोष असा प्रश्न उपस्थित केला होता, त्यामुळे या सर्व बाबींची सध्या पोलिसांकडून शहानिशा सुरू आहे.
आतापर्यंत चार ते पाचजणांची जबानी नोंदविण्यात आली आहे. गरज वाटल्यास अनुरागची पुन्हा चौकशी होऊ शकते असेही या अधिकार्याने सांगितले. यासंदर्भात पोलीस निरीक्षक कौस्तुभ मिठबावकर यांची भेट घेतली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला, तपास सुरू असल्याने आताच काहीच सांगणे उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.