पुढारी ऑनलाईन डेस्क - दाक्षिणात्य अभिनेते, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ८ वर्षांचा मुलगा मार्क शंकर आगीत गंभीर जखमी झाला. सिंगापूर येथील शाळेत लागलेल्या आगीत ही घटना घडली.
पवन कल्याण यांचा लहान मुलगा मार्क शंकर सिंगापूरमधील एका शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत अचानक लागलेल्या आगीत तो जखमी झाला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मार्क शंकरच्या हात-पायाला भाजले आहे. त्याला सिंगापूर येथील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पवन कल्याण आंध्र प्रदेशमध्ये अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
जन सेना पार्टीने आपल्या ऑफिशियल एक्स अकाऊंटवर पोस्ट करत लिहिलं, “पवन कल्याण यांनी काल अराकू जवळील कुरिडी गावच्या आदिवासींना भेटण्याचे वचन दिले होते. ते त्याठिकाणी जाऊन त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.”
पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, काही विकास योजना सुरू व्हायला हव्या. म्हणून ते दौरा संपल्यानंतरच सिंगापूरकडे रवाना होतील. येथील दौरा संपल्यानंतर विशाखापट्टनम पोहोचतील, तेथून सिंगापूर जाण्यासाठी तयारी सुरु आहे.