मराठी 'आनंद' चित्रपटाची घोषणा Instagram
मनोरंजन

Anand Movie In Marathi | राजेश खन्ना यांचा चित्रपट 'आनंद' आता मराठीमध्ये...

मराठी 'आनंद' चित्रपटाची घोषणा, कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नाटकावर आधारित चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - १९७१मध्ये प्रदर्शित झालेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित 'आनंद' या हिंदी चित्रपटाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या चित्रपटात राजेश खन्ना यांनी साकारलेला आनंद मृत्यूनंतरही रसिकांच्या मनात अजरामर झाला. यातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही खूप गाजली. त्यामुळेच आजही हा चित्रपट टेलिव्हीजनर लागल्यास प्रेक्षक तो आवडीने पाहतात. आता विघ्नहर्ता फिल्म्सने मराठी भाषेत 'आनंद' चित्रपट आणणार आहे. २९ डिसेंबर या राजेश खन्ना यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत मराठी 'आनंद' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

निर्माते दिलीप शेट्टी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हेमंतकुमार महाले या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 'आनंद' प्रदर्शित झाल्यावर हृषिकेश मुखर्जी जेव्हा नाशिकला गेले होते, तेव्हा त्यांनी कुसुमाग्रजांना आपल्यासोबत 'आनंद' बघण्याची विनंती केली होती. इतकेच नव्हे तर सिनेमा पाहिल्यावर 'आनंद'चे नाट्यरूपांतर करण्याचा आग्रहही मुखर्जींनी कुसुमाग्रजांना केला होता. त्यानंतर आपला अस्तकाल एका बेहोश धुंदीत व्यतीत करणाऱ्या नायकाच्या कथेवर स्वत:च्या काव्यात्म प्रतिभेचे संस्कार करत कुसुमाग्रजांनी 'आनंद' नावाचे एक भव्य नाट्य लिहिले. या नाटकावर मराठी 'आनंद' आधारलेला आहे.

'आनंद'मध्ये मराठी रसिकांच्या आवडीनिवडी आणि बदललेल्या काळानुरूप काही बदल करण्यात येणार असले तरी मूळ गाभा तसाच ठेवण्यात येणार आहे. हिंदी चित्रपट जिथे संपला, त्याच्या पुढेही मराठी 'आनंद' जाणार असल्याचे संकेत दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, कुसुमाग्रजांचे संवाद आणि कवितांचा योग्य वापर चित्रपटात करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'आनंद'चा लुक बदलला जाईल. सुमधूर संगीताची नेत्रसुखद नृत्यासोबत सांगड घातली जाईल. कथानकातील गाण्यांच्या जागा बदलून मराठी चित्रपटाचे नावीन्य जपण्यात येईल. काही नवीन व्यक्तिरेखा आणि दृश्यांचा समावेशही केला जाईल. 'आनंद'च्या नायिकेचे सादरीकरण सरप्राईज पॅकेज ठरेल. चित्रपटाच्या शेवटी एक उत्कंठावर्धक दृश्य वाढवण्यात येणार आहे. याखेरीज नयनरम्य लोकेशन्सवर 'आनंद'चे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचेही महाले म्हणाले.

डॅा. भास्कर बॅनर्जी म्हणजेच बाबूमोशाय कोण बनणार? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे कलाकारांची निवड झाल्यावर समोर येतील. 'आनंद'मध्ये दिवंगत अभिनेते रमेश देव यांनी डॅा. प्रकाश कुलकर्णी यांची भूमिका केली होती. या चित्रपटात ती व्यक्तिरेखा कोणत्या कलाकाराच्या वाट्याला येते ते पाहाणेही महत्त्वाचे ठरणार आहे. डिओपी सुरेश सुवर्णा या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार आहेत. कला दिग्दर्शन निलेश चौधरी करणार असून, अविनाश-विश्वजीत ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची संगीतकार जोडी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT