पुढारी ऑनलाईन डेस्क : Jeff Bezos and Lauren Sanchez : ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ ख्रिसमसच्या दिवशी लग्नबंधनात अडकणार आहेत. अस्पेन येथे होणाऱ्या या सोहळ्याला जेफ आणि लॉरेन या दोघांचे जवळचे मित्र आणि हाय-प्रोफाइल पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
ब्रिटनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द सनच्या वृत्तात म्हटलंय की, ‘अब्जाधीश उद्योगपती जेफ बेझोस आणि त्याची दीर्घकाळची मैत्रीण लॉरेन सांचेझ या ख्रिसमसमध्ये अस्पेनमध्ये लग्न करणार आहेत. दोघेही त्यांचा दिवस खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. त्यांचे लग्न खूप आधी होणार होते पण वकिलांमुळे त्यांचे लग्न रखडले आहे. एस्पेनच्या आसपास नेहमीच दिसणारे हे जोडपे 2018 पासून रिलेशनशिपमध्ये आहे. या जोडप्याच्या जवळच्या एका सूत्राने याबाबत माहिती दिली आहे.
बेझोस आणि लॉरेनचे नाते 2018 मध्ये सार्वजनिक झाले. त्यावेळी ते दोघेही त्यांच्या आधीच्या लग्नबंधनात होते. बेझोस आणि लॉरेनचे नाते समोर आल्यानंतर बेझोसने तत्कालीन पत्नी मॅकेन्झी स्कॉटला घटस्फोट दिला. घटस्फोटात बेझोस यांना त्यांच्या संपत्तीपैकी अर्धी मालमत्ता त्यांच्या माजी पत्नीला द्यावी लागली होती. सर्वात महागडा घटस्फोट म्हणून त्याची नोंद झाली आहे.