आगामी व्हॅलेंटाईन डे प्रेमाच्या चाहत्यांसाठी यंदा काहीतरी हटके घेऊन येणार आहे. प्रेमकथेच्या पारंपरिक चौकटीला हॉरर आणि कॉमेडीची अनोखी फोडणी देणाऱ्या ‘अमर प्रेम कथा’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
पोस्टरमध्ये एका बाजूला मानवी हात, तर दुसऱ्या बाजूला भुताचा हात दिसतो. या दोन्ही हातांच्या मध्यभागी काट्यांनी वेढलेले लाल गुलाबाचे फूल आहे. प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाभोवती दिसणारे काटे आणि त्यासोबतची भुताटकी प्रतिमा चित्रपटाच्या रोमँटिक कथेला असणाऱ्या हॉरर टचची झलक देतात. पोस्टरच्या या संकल्पनेतूनच ‘अमर प्रेम कथा’ ही नेहमीच्या प्रेमकथांपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते.
‘सुपर डुपर’ या चित्रपटाच्या यशानंतर लेखक-दिग्दर्शक समीर आशा पाटील पुन्हा एकदा एका आगळ्यावेगळ्या विषयासह प्रेक्षकांसमोर येत आहेत. यावेळी त्यांनी प्रेम, भीती आणि विनोद यांचा संगम चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
चित्रपटात मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांची मोठी फळी पाहायला मिळणार आहे. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, ओंकार भोजने, पार्थ भालेराव, रोहित माने, विनायक माळी आणि सयाजी शिंदे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहे.
रोमँटिक क्षणांना भुताटकीची किनार, त्यात भन्नाट प्रसंग आणि खळखळून हसवणारा विनोद असा मनोरंजनाचा तडका ‘अमर प्रेम कथा’मध्ये पाहायला मिळणार आहे. डॉ. पल्लवी जाधव, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी ‘अमर प्रेम कथा’ची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे.
व्हॅलेंटाईन डेला ‘अमर प्रेम कथा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०२७ मधील व्हॅलेंटाईन डे मराठी चित्रपटप्रेमींसाठी काहीसा वेगळा आणि मनोरंजक ठरणार असल्याचे चित्र आहे. प्रेमकथा, हॉरर आणि कॉमेडी यांचा हा अनोखा संगम मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता व्हॅलेंटाईन डेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘अमर प्रेम कथा’ संपूर्ण महाराष्ट्रात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.