Alpha Cast Fees
आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्या बहुप्रतीक्षित 'अल्फा' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. YRFच्या या स्पाय अॅक्शनपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कलाकारांच्या मानधनाची चर्चा रंगली असून, त्यात आलिया भट्टने सर्वाधिक मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शर्वरीचे मानधन आलियाच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बॉबी देओल आणि अनिल कपूर यांनाही आलियापेक्षा कमी मानधन मिळाल्याची चर्चा आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, 'अल्फा'मधील दमदार अॅक्शन भूमिकेसाठी आलिया भट्टला तब्बल २५ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. तर दुसऱ्या सुपर-एजंटच्या भूमिकेत दिसणाऱ्या शर्वरीला ३ कोटी रुपये मिळाल्याचे म्हटले जात आहे. या दोघींच्या मानधनातील मोठ्या फरकामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
महिला कुस्तीपटूंची भेट
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवा महिला कुस्तीपटूंना आलिया भट्टने भेट दिली. अल्फा च्या प्रदर्शनापूर्वी आलिया भट्टने पुण्यातील एका व्यायामशाळेला भेट दिली. आलियाने कुस्तीपटूंची कठोर सराव सत्रे आणि मैत्रीपूर्ण कुस्ती सामने पाहिले. आदित्य चोप्रा निर्मित आणि शिव रावैल दिग्दर्शित 'अल्फा'मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट येत्या शुक्रवारी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अल्फाच्या दमदार मेकिंगची झलक
यशराज फिल्म्सने अल्फाचा एक हाय-ऑक्टेन बिहाईंड-द-सीन्स व्हिडिओ रिलीज केला आहे. या मेकिंग व्हिडिओमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी चित्रपटातील काही अत्यंत आव्हानात्मक अॅक्शन सीक्वेन्स स्वतः करताना दिसत आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक शिव रवैल यांनी सांगितले की, या कठीण अॅक्शन सीक्वेन्ससाठी दोन्ही अभिनेत्रीांनी विस्तृत आणि कठोर प्रशिक्षण घेतले होते. जेव्हा तुम्ही चित्रपट आणि त्यातील अॅक्शन सीक्वेन्स पाहाल, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व त्यांनी स्वतः केले आहे, असे शिव यांनी सांगितले. आदित्य चोप्रा निर्मित आणि ‘द रेल्वे मेन’ फेम दिग्दर्शक शिव रवैल दिग्दर्शित अल्फा हा चित्रपट ३ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या दुरुस्तीसह चित्रपटाला ग्रीन सिग्नल
अल्फा चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) यू/ए १६+ प्रमाणपत्र दिले आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात मोठे बदल किंवा कट्स सुचवण्यात आले नसून, केवळ सुरुवातीच्या डिस्क्लेमरमध्ये काही आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे निर्मात्यांना फारसे संपादन करावे लागले नाही.
हा चित्रपट ३ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, त्याचा कालावधी १४० मिनिटे (२ तास २० मिनिटे ४८ सेकंद) आहे. चित्रपटात नेमके किती कट्स करण्यात आले, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सीबीएफसीने कोणतेही मोठे बदल न करता चित्रपटाला मंजुरी दिल्याचे मानले जात आहे. या चित्रपटात बॉबी देओल आणि अनिल कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, हृतिक रोशनचा कॅमिओही प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याची चर्चा आहे.